वायुप्रदूषण कमी करण्यासाठी मनपाची समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 01:39 AM2019-12-17T01:39:06+5:302019-12-17T01:39:33+5:30
शहरातील वायुप्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठविलेला आराखडा मंजूर झाल्यानंतर आता त्याच्या अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून, लवकरच या समितीची पहिली बैठक होणार आहे.
नाशिक : शहरातील वायुप्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठविलेला आराखडा मंजूर झाल्यानंतर आता त्याच्या अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून, लवकरच या समितीची पहिली बैठक होणार आहे.
देशात नव्हे तर जगात राजधानी दिल्लीचा प्रश्न गाजत आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात वायुप्रदुषण होऊ नये यासाठी केंद्र शासनाने देशभरातून काही शहरे निवडली असून, राज्यात एकूण १८ शहरे आहेत. त्यानंतर या शहरांमधील प्रदूषण कमी व्हावे यासाठी या शहरांना आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेने तयार केलेला आराखडा राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला होता. तो महिनाभरापूर्वीच मंजूर झाला असून, आता या आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरुवात करण्यात येणार आहे.
आराखड्याच्या अंमल बजावणीसाठी शासनाच्या निर्देशानुसार समिती गठित करण्यात आली आहे. यात महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे हे समितीचे अध्यक्ष असतील तर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी हे सदस्य सचिव असतील. याशिवाय या समितीत पोलीस अधिकारी, आरटीओ अधिकारी यांचादेखील समावेश करण्यात आला आहे. लवकरच या समितीची बैठक होणार आहे.
शहरातील वायू प्रदूषणाला वेळीच आळा घालण्याबरोबरच व्यापक जनजागृती करण्याचा समितीचा प्रमुख उद्देश असणार
आहे.
अनेक उपाययोजनांचा समावेश
शहरातील वायुप्रदूषण थांबविण्यासाठी आराखड्यात अनेक उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात शहरात हरित पट्टे तयार करणे, वायुप्रदूषण करणाºया मोटारींवर कारवाई करणे यांसह अन्य उपायांचा समावेश आहे.