बीएचआर घोटाळ्याशी संबंधित प्रकरणांची महापालिकेतही चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:41 AM2020-12-04T04:41:02+5:302020-12-04T04:41:02+5:30
जळगावमधील बीएचआर मल्टिस्टेट घोटाळ्याची पाळेमुळे अनेक ठिकाणी रुजल्याचे उघड आहेत. विशेषत: या प्रकरणात पुण्याच्या आर्थिक गुन्हा शाखेच्या पथकाने गेल्या ...
जळगावमधील बीएचआर मल्टिस्टेट घोटाळ्याची पाळेमुळे अनेक ठिकाणी रुजल्याचे उघड आहेत. विशेषत: या प्रकरणात पुण्याच्या आर्थिक गुन्हा शाखेच्या पथकाने गेल्या आठवड्यात जळगावमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले. त्यात प्रमुख संशयित व्यावसायिक सुनील झंवर याच्या अनेक उद्योगांची कागदपत्रे सापडली आहेत. त्यातून त्याची गुंतवणूक आणि अनेक प्रकारचे व्यवहार उघड होत आहेत. झंवर यांंच्याशी संबंधित काही व्यक्तींनी नाशिक महापालिकेतदेखील गुंतवणूक केल्याची चर्चा असून, बांधकामांच्या ठेक्याबरेाबरच स्मार्ट सिटीतदेखील कामे घेतल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच महापालिकेच्या स्वच्छतेच्या ठेक्याबाबतदेखील काही कागदपत्र झाडाझडतीत आढळली. विशेषत: ओळखपत्रे आणि अन्य कागदपत्रे आढळल्याने आता आर्थिक गुन्हा शाखेचे पथक लवकरच नाशिक महापालिकेकडे मोर्चा वळवणार असल्याचे वृत्त असून महापालिकेतील ठेक्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
नाशिक महापालिकेतील काही प्रकरणात झंवर आणि त्याच्या निकटवर्तीयांचा सहभाग असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर आयुक्त कैलास जाधव यांनी महापालिकेच्या उपआयुक्तांना यासंदर्भात चौकशी करण्यास सांगितले आहे. नाशिकमध्ये केवळ सफाईच नव्हे तर बांधकामपासून अन्य अनेक ठेक्यात आर्थिक गुंतवणुकीचा संशय व्यक्त केला जात असला तरी आयुक्तांनी तूर्तास एकाच प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. याशिवाय सफाई कामगारांच्या आउटसोर्सिंग ठेक्यातच यापूर्वीच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी उपआयुक्त करुणा डहाळे यांना आदेशित केले आहे. आउट सोर्सिंगच्या ठेक्यात सफाई कामगारांकडून संबंधित ठेकेदाराने पंधरा हजार रुपयांची अनामत रक्कम घेतली होती. त्याचे अधिकृतरीत्या समर्थन केले होते. या तक्रारीबरोबरच सफाई कामगारांना नियमानुसार
वेतन मिळते किंवा नाही याबाबतदेखील डहाळे यांना चौकशी करण्यास सांगितले आहे.
कोट..
बीएचआर संदर्भात तपासणीत नाशिक महापालिकेच्या स्वच्छतेच्या ठेक्याशी संबंधित काही कागदपत्रे आढळल्याचे कळले. त्यानुसार अधिकाऱ्यांना माहिती घेण्यास सांगितले आहे.
- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका