महापालिकेचे अंदाजपत्रक 2173 कोटींवर
By admin | Published: June 24, 2017 12:30 AM2017-06-24T00:30:14+5:302017-06-24T00:30:26+5:30
नाशिक : महापालिका महासभेने स्थायी समितीने सादर केलेल्या १७९९.३० कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात आणखी ३७४.०६ कोटी रुपयांची भर घातल्याने अंतिम अंदाजपत्रक २१७३ कोटींवर जाऊन पोहोचले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिका महासभेने स्थायी समितीने सादर केलेल्या १७९९.३० कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात आणखी ३७४.०६ कोटी रुपयांची भर घातल्याने अंतिम अंदाजपत्रक २१७३ कोटींवर जाऊन पोहोचले आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असतानाही मागील वर्षाच्या तुलनेत महासभेने यंदा ४११.८४ कोटी रुपयांनी भर घातली आहे. त्यामुळे जमा आणि खर्च बाजू पाहता अंदाजपत्रकातील तरतुदींची अंमलबजावणी करताना प्रशासनाची कसोटी लागणार आहे.
सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी १४१०.०७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यानंतर स्थायी समितीने त्यात ३८९ कोटी रुपयांची भर घातल्याने अंदाजपत्रक १७९९.३० कोटींवर जाऊन पोहोचले होते. स्थायी समितीने महासभेला अंदाजपत्रक सादर केल्यानंतर महापौरांनी प्राप्त सूचना-उपसूचनांच्या आधारे अंदाजपत्रकात आणखी ३७४.०६ कोटी रुपयांची भर घातल्याने अंतिम अंदाजपत्रक अखेर २१७३.३६ कोटींवर थांबले आहे.
त्याबाबतचा महासभेचा ठराव नुकताच नगरसचिव विभागाला प्राप्त झाला असला तरी त्यात आणखी काही लेखाशीर्षाखाली भर घालण्याची तयारी महापौरांकडून सुरूच आहे. महासभेने नगरसेवक निधी म्हणून प्रत्येकी ७५ लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. याशिवाय, खेडे विकास निधीसाठी १० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे तर महापौर निधीसाठी ५ कोटी, उपमहापौर व स्थायी समिती सभापतीसाठी प्रत्येकी ३ कोटी, सभागृहनेत्यासाठी २ कोटी, विरोधीपक्षनेत्यासाठी १ कोटी,
प्रभाग समिती सभापतींसाठी प्रत्येकी ५० लाख रुपये तर महिला बालकल्याण समिती सभापतीकरिता ५० लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. कामांची निकड व सदस्यांच्या सूचना विचारात घेऊन कामांचे प्रस्ताव मान्य करण्याच्या सूचना अंदाजपत्रकात महासभेने प्रशासनाला केल्या आहेत. याचबरोबर एका लेखाशीर्षाखाली रक्कम दुसऱ्या लेखाशीर्षात वर्ग करण्यासाठी आयुक्तांना अधिकार प्रदान करण्यात आले आहे.
ग्रंथयात्रेसाठी ३६ लाखांची तरतूद
महासभेने ग्रंथयात्रेसाठी ३६ लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. मागील पंचवार्षिक काळात तत्कालीन उपमहापौर गुरुमित बग्गा व नगरसेवक शाहू खैरे यांनी ग्रंथयात्रेचा उपक्रम राबविण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. त्यासाठी २५ लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. परंतु, निवडणूक आचारसंहितेमुळे ग्रंथयात्रेला मुहूर्त लाभू शकला नव्हता. मात्र, आता सत्तेवर आलेल्या भाजपाने त्यासाठी ३६ लाखांची तरतूद केली आहे. याशिवाय, रस्ते यांत्रिकी पद्धतीने सफाई करण्यासाठीही ५.२५ कोटींची तरतूद करण्यात आली असून, रस्ते बांधणीसाठी तब्बल ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.
चार वर्षांतील अंदाजपत्रक (रुपये कोटीत)
सन आयुक्त स्थायी समिती महासभा प्रत्यक्ष जमा
२०१४-१५ १८५७.६९ २९६५.६९ ३०४३.६९ ९६७.०३
२०१५-१६ १४३७.६७ १७६९.९७ २१७९.९७ ११३२.८४
२०१६-१७ १३५७.९६ १७३७.९६ १७६१.५२ १४०२.४६
२०१७-१८ १४१०.०७ १७९९.३० २१७३.३६ ———-