संमेलन स्थळाहून महापालिकेने संकलित केला आठ टन कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 01:01 AM2021-12-08T01:01:36+5:302021-12-08T01:02:06+5:30
गेल्या शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस चाललेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महापालिकेने देखील हातभार लावला असून, तीन दिवसांत सुमारे आठ टन कचरा संकलित केला आहे.
नाशिक : गेल्या शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस चाललेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महापालिकेने देखील हातभार लावला असून, तीन दिवसांत सुमारे आठ टन कचरा संकलित केला आहे. त्यामुळे संमेलन स्थळी स्वच्छता राखण्यात आणि आरोग्यदायी वातावरण तयार करण्यात प्रशासनाला मोठे यश आले आहे. कोरोनाचा संकटकाळ पुन्हा सुरू होतो की काय या विवंचनेत असतानाच नाशिक महापालिकेने याठिकाणी लसीकरण आणि अँटिजन चाचण्यांची व्यवस्था केली हेाती. त्या पाठोपाठ ६० कर्मचारी नियुक्त केले हेाते. संमेलनाच्या ठिकाणी एकूण चार दिवस स्वच्छता राखण्याचे काम या कर्मचाऱ्यांनी केले तसेच आठ टन कचरा संकलित केला. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने कचरा संकलन करण्यासाठी एक मोठी घंटागाडी तसेच दोन छोटे वाहन तसेच तीन मोबाईल टाॅयलेट, प्रेशर टँकर अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे डॉ. आवेश पलोड यांनी दिली.