महापालिका करणार ‘डेथ आॅडिट’ !
By संजय पाठक | Published: June 25, 2020 02:11 AM2020-06-25T02:11:53+5:302020-06-25T02:15:36+5:30
शहरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येपेक्षा मृत्यू होणाऱ्यांची संख्या चिंता वाढवणारी आहे. आत्तापर्यंत झालेल्या ७७ मृत्यूंपैकी बहुतांश मृत्यू ज्येष्ठ आणि वयोवृद्ध व्यक्तींचे झाले असले तरी त्यांना अन्य आजारदेखील होते. तथापि, मृत्यूची अचूक मीमांसा करण्यासाठी आता डेथ आॅडिट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येपेक्षा मृत्यू होणाऱ्यांची संख्या चिंता वाढवणारी आहे. आत्तापर्यंत झालेल्या ७७ मृत्यूंपैकी बहुतांश मृत्यू ज्येष्ठ आणि वयोवृद्ध व्यक्तींचे झाले असले तरी त्यांना अन्य आजारदेखील होते. तथापि, मृत्यूची अचूक मीमांसा करण्यासाठी आता डेथ आॅडिट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
शहरात कोरोनामुळे मृतांची संख्या ७७ झाली आहे. दररोज तीन ते चार कोरोनाबाधितांचा मृत्यू होत असून, त्यात जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. तर कमी वयाच्या नागरिकांचादेखील समावेश असल्याने मृत्युदर रोखण्याचे आव्हान उभे ठाकल्याची माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. त्यामुळेच आता मृत्यूसंदर्भातदेखील आॅडिट करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.
बाधितांच्या संख्येत महिलांपेक्षा पुरूषांचे प्रमाण अधिक आहे. विशेषत: २१ ते ४० वर्षे याच वयोगटात ३२९ पुरुष आणि २४४ महिलांना संसर्ग झाला आहे. या वयोगटातील पुरुष अधिक प्रमाणात बाहेर पडतात. त्यामुळे हे प्रमाण अधिक आहे. तर दुसरीकडे मधुमेह, रक्तदाब यामुळे ४१ ते ६० या वयोगटातील रूणांची संख्यादेखील अधिक आहे. यातदेखील पुरुष रुग्ण अधिक आहेत.
कोरोनामुक्तचे प्रमाण ४०.६७ टक्के !
शहरातील कोरोनाबाधितांची संख्या अत्यंत वेगाने वाढते आहे. ही संख्या आता तेराशेच्या वर गेली आहे. मात्र, त्याचबरोबर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्यादेखील अधिक आहे. मंगळवारी (दि.२३) प्राप्त असलेल्या आकडेवारीनुसार शहरातीत १ हजार ३७२ झाली आहे. मात्र, बरे होण्याचे प्रमाणदेखील अधिक आहे. त्यात आत्तापर्यंत ५५८ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर उपचाराधीन रुग्णांची संख्या ७३८ आहे.
ृमृत्युदर नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या टीमची मदत
दाट लोक वस्तीतील मृतांची संख्या अधिक असून मृत्यूचे हे प्रमाण रोखण्यासाठी मुंबई येथील कोरोनाविरोधी टास्क फोर्सचे अध्यक्ष
डॉ. संजय ओक यांचे मार्गदर्शन महापालिकेच्या सर्व वैद्यकीय अधिकाºयांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. काही गरज भासल्यास त्यांच्या टास्क फोर्समधील सहकाºयांचेदेखील मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेकदा यासंदर्भात व्हिडिओनेदेखील मार्गदर्शन घेतले जात आहेत. शहरात स्वतंत्र टास्क फोर्सदेखील तयार केला जात आहे.
शहरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ज्येष्ठांमध्ये श्वासोच्छ्वास, मूत्रपिंड, हृदयविकार, मधुमेह अशा प्रकारचे अन्य आजारदेखील होते. मात्र, त्यानंतरदेखील सर्व प्रकारच्या मृत्यूचे आॅडिट करण्यात येणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक आणि महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी हे आॅडिट करणार आहेत. याशिवाय शहरातील बाधितांचा मृत्युदर कमी करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. शहरातील दाट लोकवस्तीचे वडाळा, जुने नाशिक आणि पेठरोड- रामनगर परिसर हे कोरोनाच्या दृष्टीने संवेदनशील स्पॉट आहेत. त्या ठिकाणी मनपाने खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मदतीने प्राथमिक लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणीदेखील सुरू करण्यात आली आहे.
असेही गमे यांनी सांगितले.