पालिकेने तब्बल सव्वाशे मिळकती केल्या सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 01:00 AM2018-06-02T01:00:07+5:302018-06-02T01:00:07+5:30
खासगी संस्था आणि राजकीय नेते यांच्या ताब्यात असलेल्या शहरातील मिळकती महापालिकेने ताब्यात घेण्यास प्रारंभ केला असून, तीन दिवसांत सव्वाशे मिळकतींना सील करण्यात आल्याचे वृत्त आहे त्यातील सिडको विभागातील सुमारे चाळीस मिळकतींचा समावेश आहे.
नाशिक : खासगी संस्था आणि राजकीय नेते यांच्या ताब्यात असलेल्या शहरातील मिळकती महापालिकेने ताब्यात घेण्यास प्रारंभ केला असून, तीन दिवसांत सव्वाशे मिळकतींना सील करण्यात आल्याचे वृत्त आहे त्यातील सिडको विभागातील सुमारे चाळीस मिळकतींचा समावेश आहे. दरम्यान, महापालिकेच्या उत्साही अधिकाऱ्यांनी कार्यरत असलेल्या अभ्यासिकांमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढून काही मिळकती सील केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तथापि, ही चूक दुरुस्त करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या मालकीच्या ९०३ मिळकती आहेत. त्यातील समाजमंदिरे, अभ्यासिका आणि व्यायामशाळांसारख्या मिळकती महापालिकेने खासगी संस्थांना दिल्या आहेत. परंतु अनेक मिळकतींचा वापर होत नाही तर अनेक मिळकतींचा नियमबाह्य पद्धतीने व्यावसायिक वापर सुरू आहेत. काही मिळकतींचे तर महापालिकेबरोबरचे भाडेकरार आणि महासभेचे ठरावदेखील उपलब्ध नाहीत. किंंबहूना काही फाइलीच गहाळ झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने अशा मिळकतींना गेल्याच महिन्यात नोटिसा बजावल्या होत्या आणि गेल्या तीन दिवसांपासून मिळकती ताब्यात घेण्यास प्रारंभ झाला आहे. विभागीय अधिकाºयांमार्फत सुरू असलेल्या या कारवाईमुळे राजकीय नेते आजी-माजी नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. महापालिकेच्या अधिकाºयांनी उत्साहाच्या भरात अनेक मिळकती सील केल्या असून, त्यात कार्यरत असलेल्या समाजमंदिर, व्यायामशाळा आणि अभ्यासिकांचादेखील समावेश आहे. या चुका दुरुस्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सदरची मोहीम सुरूच राहणार आहे. महापालिकेने बंद पडलेल्या, करार नसलेल्या आणि अन्य मिळकती सील करण्यास प्रारंभ केला आहे. त्यासंदर्भात अगोदरच संबंधितांना नोटिसा बजावल्या होत्या. काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कार्यरत मिळकती सील केल्याच्या तक्रारी असून, या चुका दुरुस्त केल्या जातील.
- रोहिदास दोरकूळकर, उपआयुक्त, मनपा