महापालिका : प्रशासनाचे दुर्लक्ष; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात तोरणानगर शाळा धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:55 AM2017-12-16T00:55:21+5:302017-12-16T00:56:14+5:30
येथील प्रभाग क्रमांक २९ तोरणानगर येथील महापालिकेच्या शाळेची इमारत बांधून सुमारे २७ वर्षे झाली असून, सद्यस्थितीत या शाळेची दयनीय अवस्था झाली आहे.
सिडको : येथील प्रभाग क्रमांक २९ तोरणानगर येथील महापालिकेच्या शाळेची इमारत बांधून सुमारे २७ वर्षे झाली असून, सद्यस्थितीत या शाळेची दयनीय अवस्था झाली आहे. शाळेची इमारत ही पावसाळ्यात गळत असून, सदर शाळेचे स्ट्रक्चर आॅडिट केल्यानंतर ती धोकादायक ठरविलेली असतानाही महापालिकेच्या अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला असल्याने पालकवर्गाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. विषेश म्हणजे, मनपा आयुक्तांनीदेखील शाळेच्या इमारतीची अवस्था पाहून याठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी इस्टीमेट तयार करण्यास सांगितल्यानंतरही याकडे डोळेझाक केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महापालिकेच्या तोरणानगर शाळेची दयनीय अवस्था झाली असून, शाळेची इमारत धोकादायक झाल्याचे शिवसेना नगरसेवक रत्नमाला राणे यांनी मनपा आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आयुक्तांनीही या शाळेची पाहणी करीत संबंधित अधिकाºयांना शाळेच्या नूतनीकरणाबाबत सांगितले होते; परंतु केवळ मनपा प्रशासनातील अधिकाºयांच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे याकडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोपही नगरसेवक राणे यांनी केला. इमारत बांधण्याबाबत बांधकाम विभाग चालढकल करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नगरेसवक राणे यांनी महासभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. यावर आयुक्तांनी महासभेत इमारत तयार करण्यात येईल असे सांगितले. यानंतर स्ट्रक्चर आॅडिट करून त्याचा रिपोर्ट आल्यानंतर सदर शाळेची इमारत धोकादायक असून, विद्यार्थ्यांच्या जिवास धोका असल्याने तत्काळ पाडण्यात यावी, असे स्पष्ट केले आहे. बांधकाम, शिक्षणमंडळ विभागाला वेळोवेळी पत्र शाळेचे मुख्याध्यापक, पालक यांनी वेळोवेळी बांधकाम, शिक्षण मंडळ विभाग यांना पत्रदेखील देत आले आहे, परंतु बांधकाम विभाग कुठेतरी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. याबाबत नगरसेवक राणे यांनी कार्यकारी अभियंता रामसिंग गांगुर्डे यांना विचारणा केली असता सध्या ही इमारत बांधायची नाही असे सांगितले. यावर राणे यांनी एखादी दुर्घटना घडल्यास काय करणार असे विचारल्यावर तेव्हाचे तेव्हा पाहू असे म्हटल्याचे राणे यांनी सांगितले.