महापालिका : उद्यान अधीक्षकाचा प्रस्ताव शासनाकडे उद्यान देखभालीत कुचराई; ठेका रद्द करण्याची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:15 AM2017-12-18T01:15:26+5:302017-12-18T01:15:58+5:30
महापालिकेने उद्याने देखभालीसाठी दिलेल्या ठेकेदारांच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास संबंधितांचा ठेकाच रद्द करण्यात येणार असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
नाशिक : महापालिकेने उद्याने देखभालीसाठी दिलेल्या ठेकेदारांच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास संबंधितांचा ठेकाच रद्द करण्यात येणार असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. दरम्यान, उद्यान विभागाचा तात्पुरता कार्यभार एस. एस. रौंदळ यांच्याकडे सोपविण्यात आला असून, उद्यान अधीक्षकाचे पद प्रतिनियुक्तीवर भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचेही आयुक्तांनी म्हटले आहे.
उद्यान विभागाला पश्चिम प्रभागाच्या सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी टाळे ठोकल्यानंतर त्याबाबत आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त आणि उद्यान अधीक्षकाशी चर्चा केली. उद्यान विभागाच्या एकूणच कामकाजाबद्दल नंतर आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, उद्यान विभागासाठी मुळातच कर्मचारीवर्ग अपुरा आहे. त्यामुळे उद्यान विभागासाठी अन्य विभागांतून काही कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. जी उद्याने देखभालीसाठी ठेकेदारांकडे देण्यात आलेली आहेत, त्यांचा आढावा घेण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त रमेश पवार आणि उद्यान अधीक्षक यांना देण्यात आल्या आहेत. त्यात जे ठेकेदार काम करत नसतील त्यांचा ठेका रद्द करण्यात येईल. मी स्वत: प्रभागांमध्ये दौरा करत असताना काही ठिकाणी उद्यानांचे काम समाधानकारक वाटले परंतु काही उद्यानांची स्थिती खराब दिसून आली आहे. त्यानुसार, संबंधितांना नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. परंतु, नोटिसा बजावूनही कामात सुधारणा होत नसेल तर ठेका रद्द केला जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले. दरम्यान, डॉ. पाटील यांनी टाळे लावण्यापूर्वी आयुक्तांशी या विषयावर चर्चा करायला हवी होती. त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न गंभीरच आहे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.