महापालिका : विभागीय कार्यालयांमध्येही नोंदणीची सुविधा ३,७६४ दिव्यांगांचे पेन्शनसाठी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 01:25 AM2018-01-31T01:25:52+5:302018-01-31T01:26:45+5:30
नाशिक : महापालिकेने अपंग पुनर्वसन कायद्यांतर्गत आणि ३ टक्के राखीव निधीतून दिव्यांगांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला.
नाशिक : महापालिकेने अपंग पुनर्वसन कायद्यांतर्गत आणि ३ टक्के राखीव निधीतून दिव्यांगांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, या योजनेसाठी आतापर्यंत महापालिकेकडे ३,७६४ दिव्यांगांनी अर्ज दाखल केले आहेत. दिव्यांगांना सदर अर्ज दाखल करण्यासाठी आता मनपाच्या सहाही विभागीय कार्यालयांत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महापालिकेने दिव्यांगांसाठी विविध उपक्रमांची आखणी केलेली आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात सुमारे १४ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आलेली आहे. येत्या दोन महिन्यांत सदर निधी महापालिकेला खर्च करायचा आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने अहमदनगर महापालिकेच्या धर्तीवर नाशिक शहरातही दिव्यांगांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, महापालिकेच्या राजीव गांधी भवन येथे दिव्यांगांना विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार, मनपा मुख्यालयात आतापर्यंत ३,७६४ दिव्यांगांनी आपले अर्ज पेन्शन योजनेसाठी सादर केले आहेत. ज्यांनी अर्ज सादर केलेले नाहीत अशा दिव्यांगांना आता मनपाच्या सहाही विभागीय कार्यालयांत नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. दरम्यान, प्राप्त अर्जांची महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार वर्गवारी सुरू केली असून, लवकरच त्याबाबतचा परीपूर्ण प्रस्ताव महासभेवर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. भंडारी यांनी दिली. दरम्यान, आतापर्यंत जिल्हा रुग्णालयांमध्ये दिव्यांगांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सकांच्या स्वाक्षरीने दिले जात होते. मात्र, शासनाच्या नव्या निर्णयानुसार, महापालिकेच्या वैद्यकीय अधीक्षकाच्या स्वाक्षरीने अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालय आणि जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात तपासणीची सुविधा उपलब्ध करून प्रमाणपत्र प्रदान केले जाणार असल्याची माहितीही डॉ. राजेंद्र भंडारी यांनी दिली आहे.
फिरत्या दवाखान्याला प्रतिसाद
महापालिकेने २६ जानेवारीपासून दिव्यांगांसाठी फिरता दवाखाना कार्यान्वित केला आहे. गेल्या चार दिवसांत आतापर्यंत सात दिव्यांगांनी या सुविधेचा लाभ घेतला असल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली. याशिवाय, मंगळवारी (दि.३०) सातपूर येथील नॅब कार्यशाळेतील ३० दिव्यांगांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. उपचाराची गरज भासणाºया दिव्यांगांनी सदर फिरत्या दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी यांच्याशी (मोबाइल क्रमांक ९६०७०६०१२२) व वाहनचालक यांच्याशी (मोबाइल क्रमांक ९६०७०६०१३३) या क्रमांकावर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत संपर्क साधल्यास त्यांच्यापर्यंत फिरता दवाखाना पोहोचणार आहे.