सातबारा उताऱ्यांचा आता महापालिका करणार पंचनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:19 AM2021-09-17T04:19:19+5:302021-09-17T04:19:19+5:30
महापालिकेच्या मालकीच्या कोट्यवधी रुपयांच्या मिळकती आहेत. मात्र, त्याचा पुरेसा तपशीलदेखील महापालिकेकडे नाही की या भूसंपादनासाठी आणि देखभाल दुरूस्तीसाठी खर्च ...
महापालिकेच्या मालकीच्या कोट्यवधी रुपयांच्या मिळकती आहेत. मात्र, त्याचा पुरेसा तपशीलदेखील महापालिकेकडे नाही की या भूसंपादनासाठी आणि देखभाल दुरूस्तीसाठी खर्च करून देखील त्याची अधिकृतरित्या मालकी नाही. असे अनेक प्रकार उघड झाले आहेत. आता तर शहरातील मोक्याच्या जागेवरील भूखंड बीओटीवर देण्याचा घाट घातला जात असतानादेखील असाच प्रकार उघड झाला आहे. शहरातील २२ मिळकतींचा बीओटीवर विकास करायचा आहे. त्यातील ११ भूखंड पहिल्या टप्प्यात विकासकांकडे देण्यात येणार असून त्यासाठी प्रशासनाने मिळकतींची पडताळणी केला असता आठ भूखंडांच्या मालकीवर नाशिक महापालिकेचे नाव नसल्याचे आढळले आहे.
महापालिकेच्या इतक्या मुक्त कारभारामुळे प्रशासन देखील अडचणीत आले असून अशा प्रकारच्या टायटल क्लीअर नसल्याने भविष्यात कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयुक्त कैलास जाधव यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून आता गेल्या पाच - सहा वर्षांतील सर्व ताब्यात घेतलेल्या मिळकतींचा सर्व्हे करून कागदपत्रे तपासली जाणार आहेत. महापालिकेने भूसंपादन केलेल्या ज्या मिळकतींच्या सातबारा तसेच प्रॉपर्टी कार्डवर नाव नाही तेथे महापालिकेची नावे लावण्यात येेणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
कोट...
महापालिकेच्या ताब्यात असलेल्या मिळकतींची मालकी तपासून ज्या मिळकतीच्या अधिकृत कागदपत्रांवर नाव नसेल तेथे म्हणजेच प्रॉपर्टी कार्डावर देखील नाव घेण्यात येणार असून त्यासाठी एक अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे.
- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका,
इन्फो...
काय आढळले यापूर्वी
- भद्रकाली फ्रूट मार्केटच्या जागेवर भूतपूर्व नाशिक नगरपालिकेच्या नगराध्यक्षांचे नाव आहे
- गोल्फ क्लब पार्किंगच्या जागेवर सरकारी जमीन असा शेरा आहे.
- बाईज टाऊन जवळील जलधारा वसाहतीच्या जागेवर नाशिक डायोसेशन ट्रस्टचे नाव आहे
- राजीव नगर येथील भगतसिंग स्लमच्या जागी सरकारी दगडखाण असे नाव आहे.
- नाशिकरोड येथील टाऊन हॉल, सुभाष मार्केटवर नगरपालिकेचे नाव आहे.
- पंचवटी भांडार येथे अध्यक्ष नवीन समिती असा उल्लेख आहे.