मनपा दिव्यांगांना देणार स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 01:48 AM2019-08-29T01:48:22+5:302019-08-29T01:49:09+5:30
दिव्यांगांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविणाऱ्या महापालिकेने आता स्पर्धा परीक्षकांसाठीदेखील त्यांना प्रशिक्षण देण्याची अभिनव योजना आखली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांना राजीव गांधी भवनात तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
नाशिक : दिव्यांगांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविणाऱ्या महापालिकेने आता स्पर्धा परीक्षकांसाठीदेखील त्यांना प्रशिक्षण देण्याची अभिनव योजना आखली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांना राजीव गांधी भवनात तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
महापालिकेच्या अंदाजपत्रकात दिव्यांगांसाठी निधीची तरतूद असते, परंतु त्याचा उपयोग यापूर्वी केला जात नसे. मात्र गेल्या तीन वर्षांत महापालिकेने त्यावर विशेष लक्ष केंद्रित केले असून, शाळा व महाविद्यालयासाठी मदत देण्यापासून दिव्यांगांच्या विवाहासाठी योजनादेखील आखण्यात आल्या आहेत. प्रौढ दिव्यांगांना भत्तादेखील दिला जात आहे. शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये दिव्यांगांसाठी आरक्षण असते, परंतु अनेक दिव्यांगांची स्पर्धा परीक्षांसाठी खासगी क्लासेस लावण्याइतपत आर्थिक स्थिती नसते. त्यामुळे महापालिकाच आता अशाप्रकारचे प्रशिक्षण देणार आहे.
स्टाफ सिलेक्शन, यूपीएससी आणि एमपीएससी यांसारख्या परीक्षा देण्यासाठी शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादेत बसणाºया इच्छुकांकडून महापालिकेने अर्ज मागविण्याचे ठरविले आहे. आलेल्या अर्जातून पात्र व्यक्तींची निवड केली जाईल. त्यानंतर स्पर्धा परीक्षा देणाºया संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येईल आणि त्यांच्या मार्फत राजीव गांधी भवनात प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती समाजकल्याण उपआयुक्त शिवाजी आमले यांनी दिली.
दिव्यांगांसाठी मुख्यालयात सुविधा
महापालिकेने गेल्या वर्षभरात मुख्यालयात दिव्यांगांना येणे-जाणे सोपे पडेल अशा पद्धतीने खास सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, तिन्ही मजल्यांवर विशेष मार्गिका आणि प्रसाधनगृह अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत. कोणत्याही शासकीय कार्यालयात नसतील अशा प्रकारच्या सर्व दिव्यांगस्नेही सुविधा कदाचित केवळ नाशिक महापालिकेतच उपलब्ध आहेत.