महापालिका ऑक्सिजनचा राखीव साठा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:12 AM2021-06-04T04:12:28+5:302021-06-04T04:12:28+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नाशिकमध्ये ऑक्सिजन बेडसाठी रूग्णांच्या नातेवाईकांची धावपळ झाली. अनेकांना ऑक्सिजन बेड मिळाले नाही तर काहींचे मृत्यू देखील ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नाशिकमध्ये ऑक्सिजन बेडसाठी रूग्णांच्या नातेवाईकांची धावपळ झाली. अनेकांना ऑक्सिजन बेड मिळाले नाही तर काहींचे मृत्यू देखील झाले. अनेक रूग्णालयात तर ऑक्सिजनचा साठा संपत आल्यानंतर रूग्णांना अन्यत्र दाखल करण्यास देखील सांगण्यात आले होते. त्यामुळे तिसऱ्या लाटेत असे संकट उदभवू नये यासाठी आयुक्तांनी पूर्वदक्षता म्हणून राखीव साठा तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
खाते प्रमुखांच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत आयुक्तांनी कोरोना स्थितीचा आढावा घेतला. तसेच
ऑक्सिजनचा अतिरिक्त राखीव साठा करण्यासाठी तत्काळ निविदा प्रक्रिया सुरू करण्याची सूचना आयुक्तांनी आरोग्य वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे.
इन्फो...
महापालिकेकडे मुबलक साठा
नाशिक महापालिकेच्या नवीन बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयात सध्या ३२ किलो लीटर्स क्षमतेच्या ऑक्सिजनच्या दोन टाक्या आहेत. याशिवाय याठिकाणी महापालिकेने तीन किलो लीटर्स क्षमतेच्या आणखी दोन अतिरिक्त टाक्या उपलब्ध करून देण्याचे काम सुरू केले आहे. याशिवाय त्र्यंबकरोडवरील ठक्कर डोम आणि सिडकोतील राजे संभाजी स्टेडियम मधील कोविड सेंटर्समध्ये पीएसए पद्धतीचा वापर करून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प साकारण्यात येणार आहेत.