स्मार्ट सिटीपेक्षा महापालिकेची कामे बरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:18 AM2021-07-14T04:18:27+5:302021-07-14T04:18:27+5:30
स्मार्ट सिटीच्या एकूण कामे आणि त्यांचा दर्जा बघितला, तर नाशिक महापालिकेने केलेली कामे त्या तुलनेत कधीही सरस ठरेल. महापालिकेची ...
स्मार्ट सिटीच्या एकूण कामे आणि त्यांचा दर्जा बघितला, तर नाशिक महापालिकेने केलेली कामे त्या तुलनेत कधीही सरस ठरेल. महापालिकेची सर्वच कामे निर्दोष आहेत, अशातला भाग नाही. मात्र, ही कामे कंपनीच्या कामापेक्षा निश्चितच चांगली आहेत. स्मार्ट सिटीने सध्या चांगले रस्ते फोडण्याची जी कामे सुरू केली आहेत, ती मुळात कोणाची मागणी होती, कोणी सांगितले आणि त्याची गरज काय, हे कंपनीने स्पष्ट करायला हवे. कदाचित, या संदर्भात कागदोपत्री काही मागण्याही रंगविल्या जाऊ शकतात. मात्र, खरोखरीच कोणी मागणी केली, याचा शोध घ्यायला हवा.
स्मार्ट सिटीने सीबीएस ते अशोकस्तंभ ते रामवाडी हा रस्ता खरे तर अत्यंत चांगला होता. मात्र, एक इंचही रुंदीकरण केले नाही. मात्र, रस्ता फोडून पुन्हा तयार करण्यात आला. यात काय साध्य झाले कळले नाही. याच रस्त्यावर सायकल ट्रॅक तयार करण्यात आला आहे. इतक्या रहदारीच्या ठिकाणी सायकल घेऊन कोण ट्रॅकवरून जात असेल, हे शोधायला हवे. हा रस्ता पाच-सहा वर्षांपूर्वीच कुंभमेळ्यात केला होता. त्यानंतर, आता अशोकस्तंभ परिसरातील गुरांच्या दवाखान्याजवळी रस्ताही फोडला आहे. या रस्त्यावर एकही खड्डा पडलेला नाही. मात्र, तोही नव्याने तयार करण्यात येत आहे. अशाच प्रकारे रावसाहेब थोरात सभागृहासमोरील दाेनशे ते अडीचशे मीटर लांबीचा रस्ताही का फोडला हेच कळत नाही. अत्यंत कमी लांबीचे रस्ते फोडून त्यावर कोट्यवधी रुपयांचा झालेला खर्च बघितला, तर किमान प्रतिकिलो मीटर काही कोटी रुपये खर्च झालेले दिसत आहेत. पैसा केंद्राचा असो, अथवा राज्य शासन किंवा महापालिकेचा शेवटी तो जनतेच्या कर रूपाने भरलेला हा पैसा आहे. तो अशा प्रकारच्या चांगले कामे फोडून रस्ते तयार करण्यासाठी करणे म्हणजे कोट्यवधी रुपयांचा निधी गंगार्पण करण्याचाच भाग आहे.
- मोहन रानडे, माजी शहर अभियंता, महापालिका