महापालिकेचे १५ मार्चपासून शहरात महाआरोग्य अभियान
By admin | Published: March 10, 2016 11:45 PM2016-03-10T23:45:09+5:302016-03-10T23:48:06+5:30
जनजागृतीवर भर : महापौरांनी घेतली बैठक
नाशिक : साथीचे आजार आणि त्यापासून घ्यावयाची काळजी याबाबत जनमानसात जागृती करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाच्या वतीने दि. १५ मार्चपासून शहरात महाआरोग्य अभियान राबविले जाणार आहे. या अभियानात मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहे.
महापौर अशोक मुर्तडक यांनी गुरुवारी आरोग्य व वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन महाआरोग्य अभियानासंबंधी रुपरेषा निश्चित केली, शिवाय शहरात आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यावर भर देण्याचे आदेश दिले. १५ मार्चपासून शहरात महाआरोग्य अभियान राबविले जाणार असून, १५ दिवस चालणाऱ्या या अभियानात गर्भवती महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांची मोफत आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार केले जाणार आहेत. याचबरोबर शहरात आरोग्यविषयक जनजागृतीवरही भर दिला जाणार आहे. सद्यस्थितीत डेंग्यू आणि स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत असल्याने त्यासंबंधी उपाययोजना करण्याच्या सूचनाही महापौरांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ज्या भागात डासांची उत्पत्ती स्थाने आहेत तेथे धूर व औषध फवारणीच्या सूचना महापौरांनी दिल्या. बैठकीला आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. आर. गायकवाड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)