महापालिकेचा वादग्रस्त घंटागाडीचा ठेका अखेर रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 06:58 PM2019-12-31T18:58:33+5:302019-12-31T19:04:05+5:30
नाशिक- नागरीकांच्या प्रचंड तक्रारी आणि अनियमीतता या कारणांचा ठपका ठेऊन महापालिका प्रशासनाने अखेरीस सिडको आणि सातपूर या दोन विभागातील जीटी पेस्ट कंट्रोल या घंटागाडी ठेकेदाराचा ठेका रद्द केला आहे. त्यामुळे १ जानेवारीपासून पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे.
नाशिक- नागरीकांच्या प्रचंड तक्रारी आणि अनियमीतता या कारणांचा ठपका ठेऊन महापालिका प्रशासनाने अखेरीस सिडको आणि सातपूर या दोन विभागातील जीटी पेस्ट कंट्रोल या घंटागाडी ठेकेदाराचा ठेका रद्द केला आहे. त्यामुळे १ जानेवारीपासून पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे.
महापालिकेने सहा विभागांसाठी दैनंदिन केर कचरा संकलनासाठी घंटागाडीचे ठेके दिले आहेत तीन वर्षांपूर्वी एकुण १७६ कोटी रूपयांचे ठेके पाच वर्षांसाठी दिले असून त्यातील जीटी पेस्ट कंट्रोल या कंपनीला सिडको आणि पंचवटी या दोन विभागांचा ठेका देण्यात आला होता. नगरसेवकांच्या प्रचंड तक्रारी या दोन्ही विभागांसंदर्भात होत्या. ठेकेदार कंपनीला नियम निकषानुसार नव्या घंटागाड्या वापरण्यास सांगण्यात आले होते. मात्र जुन्याच घंटागाड्या वापरल्या जात होत्या. त्याच प्रमाणे त्या देखील अनियमीत होत्या. जीपीएस यंत्रणा असून देखील ते अन्य वाहनांना जोडून घंटागाडी फिरवल्या जात असल्याची तक्रार होती. प्रभाग समिती तसेच स्थायी समितीच्या बैठकांमध्ये देखील यावरून वादंग झाले होते.
नगरसेवकांच्या तक्रारीनंतर महापालिकेने देखील ठेकेदार कंपनीला अनेकदा नोटिसा बजावल्या होत्या.सुमारे पंचवीस ते तीस नोटिसा आणि दोन कोटी रूपयांहून अधिक दंड वसुलीसाठी कारवाई सुरू करून ठेकेदार कामकाजात सुधारणा करीत नसल्याने अखेरीस गेल्या महिन्यात ठेकेदाराला अंतिम नोटिस बजावण्यात आली होती. विधी विभागाचा सल्ला घेतल्यानंतर अखेरीस २३ डिसेंबर रोजी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हा ठेका रद्द केला आहे.या कंपनीचे नाशिकचे प्रतिनिधी म्हणून भाजपचे गिरीश पालवे हे काम बघत होते. पालवे यांची शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प्रशासन कारवाईस टाळाटाळ करीत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. या विषयावर सातत्याने टिका होत असल्याने पालवे यांनी कंपनीच्या प्रतिनिधीपदाचा राजीनामा दिले असे जाहिर केले होते.
मनपाच्या कारवाई नंतर ज पंचवटी विभागात वॉटर ग्रेस आणि सिडकोत विशाल एन्टरप्रायझेस या अन्य ठेकेदारांना व्यवस्था होईपर्यंत काम बघण्यास सांगण्यात आले आहे.