भंगार बाजार हटविण्यासाठी महापालिकेचे सूक्ष्म नियोजन

By admin | Published: December 22, 2016 01:00 AM2016-12-22T01:00:34+5:302016-12-22T01:00:46+5:30

सज्जता : सात पथकांमार्फत होणार कारवाई

Municipal corporation's micro-planning to remove scrap market | भंगार बाजार हटविण्यासाठी महापालिकेचे सूक्ष्म नियोजन

भंगार बाजार हटविण्यासाठी महापालिकेचे सूक्ष्म नियोजन

Next

नाशिक : चुंचाळे शिवार व अंबड-लिंकरोडवरील बहुचर्चित भंगार बाजार हटविण्याची पूर्ण तयारी महापालिकेने केली असून, त्यासाठी सूक्ष्म नियोजन केले आहे. महापालिकेच्या आणि शहराच्याही इतिहासात भंगार बाजारावरील कारवाई ही आजवरची सर्वांत मोठी कारवाई असणार आहे.  महापालिकेकडून कोणत्याही क्षणी भंगार बाजार हटविण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यानुसार, महापालिकेने भंगार बाजार हटविण्याबाबतची कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण केली असून, पोलीस बंदोबस्ताबाबतही पत्रव्यवहार केलेला आहे. याशिवाय, भंगार बाजार हटविण्यासंबंधी सूक्ष्म पातळीवर नियोजन करण्यात आले आहे. भंगार बाजारात सुमारे ५२३ दुकाने असून, मोठे शेड असल्याने सदर कारवाई ही आजवरची सर्वांत मोठी असणार आहे. त्यामुळे महापालिकेने आपल्या काही विभागांना जबाबदारीचे वाटप केले आहे. कारवाईसाठी सात पथके तयार करण्यात आली असून, एक पथक राखीव ठेवण्यात येणार आहे. तसेच ३ जेसीबी, २ पोकलॅन, २ डंपर, २ गॅसकटर सोबत अतिक्रमण विभागाची वाहने, सुरक्षारक्षक, प्लंबर, वायरमन आदि तैनात असणार आहेत. टीमप्रमुख, सहायक टीमप्रमुख यांच्यामार्फत संपूर्ण कामकाजावर नियंत्रण ठेवले जाणार असून, डिमार्केशन केलेली बांधकामेच पाडली जाणार आहेत. अनधिकृत बांधकाम हटविताना परिसरातील विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे. तसेच प्रत्येक पथकासाठी स्वतंत्र अ‍ॅम्बुलन्स तैनात असणार आहे. कुठे आगीची घटना घडल्यास त्यावर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलही सज्ज ठेवण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर बांधकाम हटविताना वाहन नादुरुस्त झाले अथवा पंक्चर झाले तर त्याचठिकाणी पंक्चर काढणारी आणि वाहन दुरुस्त करणारी यंत्रणाही उपस्थित ठेवली जाणार आहे. या सर्व कारवाईचे छायाचित्रण तसेच व्हिडिओ शूटिंग केले जाणार आहे. कारवाईत कोणताही हलगर्जीपणा होणार नाही, याचेही निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Municipal corporation's micro-planning to remove scrap market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.