महापालिकेची सोमवारी ऑनलाइन महासभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 01:03 AM2020-12-06T01:03:16+5:302020-12-06T01:04:44+5:30
महापालिकेची मासिक महासभा येत्या साेमवारी (दि. ७) ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यात अनेक विषयांबरोबरच टीडीआर घोटाळा तसेच सफाई कामगारांच्या प्रश्नाबरोबरच अन्य विषय गाजण्याची शक्यता आहे.
नाशिक : महापालिकेची मासिक महासभा येत्या साेमवारी (दि. ७) ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यात अनेक विषयांबरोबरच टीडीआर घोटाळा तसेच सफाई कामगारांच्या प्रश्नाबरोबरच अन्य विषय गाजण्याची शक्यता आहे. गेल्या महासभेच्या वेळी महापौर प्रकृती अस्वास्थ्यामुळे गैरहजर होते. त्यावेळी उपमहापौर भिकूबाई बागुल यांनी पीठासन अधिकारी म्हणून सभा घेतली होती. आता मात्र महापौरच ही सभा घेणार आहेत. -
---
महिला समितीचा आडके यांनी दिला राजीनामा
नाशिक : नामधारी ठरलेल्या महापालिकेच्या विषय समित्यांवर काम करण्यासाठी अनेक नगरसेवक तयार नाही. महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्यपदी भाजपच्या हिमगौरी आडके यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी या समितीचा राजीनामा दिला आहे. नवीन महिला सदस्याला संधी मिळावी यासाठी राजीनामा दिल्याचे आडके यांचे म्हणणे आहे. तथापि, १० डिसेंबर रोजी सभापतिपदाच्या निवडणुका होणार असताना आत्ताच आडके यांनी राजीनामा दिल्याने भाजपची अडचण होण्याची शक्यता आहे.
----
मनपा कर्मचाऱ्यांना पुढील वर्षी आयोग
नाशिक : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा असली तरी आता नवीन वर्षातच आयोग लागू होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करण्यासाठी प्रशासनाने शासनाकडे एक महिन्याची मुदत वाढवून मागितली आहे. त्यामुळे सध्या काम सुरू असले तरी वेतनश्रेणी तयार करण्यात आल्यानंतर राज्य शासनाकडून त्याची मंजुरी मिळेल त्यानंतरच पुढील कार्यवाही होण्याची शक्यता आहे.
----
दिव्यांगांना हयातीचा दाखला देण्याचे आवाहन
नाशिक : महापालिकेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने ज्या दिव्यांगांना दरमहा आर्थिक मदत देण्यात येते, त्यांना २५ डिसेंबरच्या आत हयातीचे दाखले सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रौढ बेरोजगार दिव्यांग अर्थसाहाय्य योजना तसेच गतिमंद, मेंदुपीडित व बहुविकलांग व्यक्तींना दरमहा दोन हजार रुपये अर्थसाहाय्य म्हणून देण्यात येते. त्यांना यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे.