नगर परिषद घनकचरा जमीन खरेदी रेडीरेकनर दरानेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:49 AM2021-02-05T05:49:15+5:302021-02-05T05:49:15+5:30
गटनेते हेमंत वाजे, नगरसेवक प्रमोद चोथवे, पंकज मोरे, विजय जाधव, श्रीकांत जाधव, रूपेश मुठे यांच्या उपस्थितीत नगरपरिषद पदाधिकाऱ्यांनी पत्रकार ...
गटनेते हेमंत वाजे, नगरसेवक प्रमोद चोथवे, पंकज मोरे, विजय जाधव, श्रीकांत जाधव, रूपेश मुठे यांच्या उपस्थितीत नगरपरिषद पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत जमीन खरेदीबाबतची वस्तुस्थिती कथन केली. घनकचरा व्यवस्थापनाकरिता ६.५० कोटींचा प्रकल्प अहवाल मंजूर झाल्यानंतर जागेची गरज होती. सदरची जागा अगोदरच्या मैला व्यवस्थापन जागेशेजारी असल्याने ती खरेदी करण्याचा ठराव सत्ताधारी व विरोधी गटातील सर्व नगरसेवकांनी एकमताने संमत केला आहे. दुय्यम निबंधक व जिल्हाधिकारी ठरवून देतील त्या भावाने खरेदी करण्याचा हा ठराव सर्वानुमते संमत केल्यानंतर सरकारी रेडीरेकनर दराने त्याची खरेदी झाली आहे. या ठरावापुरतीच सर्व नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची भूमिका होती. उर्वरित प्रक्रिया प्रशासनाने पार पाडली. तक्रारदार अनिल वराडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ही तक्रार केली होती. तथापि, उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी झाल्यानंतर तक्रारीत तथ्य आढळले नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
इन्फो
राजकीय हेतूने आरोप
ठरावाच्या दिवशी गटनेते हेमंत वाजे, नगरसेवक प्रमोद चोथवे गैरहजर होते. त्यांनाही नोटीस देण्यात आली असल्याने व विरोधी गटातील नगरसेवकांना नोटिसा न दिल्याने तक्रारदार वराडे यांनी राजकीय हेतूने प्रेरित होऊन तक्रार दिल्याचे स्पष्ट होत असल्याचे नगराध्यक्ष डगळे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. निवडणुका जवळ आल्याने हे राजकीय षडयंत्र रचले असल्याचे ते म्हणाले. गटनेते वाजे यांनी विरोधकांना चांगले पाहवत नसल्याचे सांगितले. हा प्रकार म्हणजे विकासाला खीळ घालण्याचे काम असल्याचे त्यांनी सांगितले.