नगराध्यक्ष निवडणुकीचा गुंता

By admin | Published: November 16, 2016 10:34 PM2016-11-16T22:34:00+5:302016-11-16T22:34:00+5:30

रत्नागिरी नगर परिषद : अपक्ष, हत्तीच्या शिरकावाने सेना, राष्ट्रवादीच्या तंबूत अस्वस्थता

Municipal elections | नगराध्यक्ष निवडणुकीचा गुंता

नगराध्यक्ष निवडणुकीचा गुंता

Next

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी
रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्षपद निवडणुकीचे गणित अत्यंत गुंतागुंतीचे बनले आहे. शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी यांच्यातील अंतर्गत गटबाजी या पक्षाच्या उमेदवारांना भोवण्याची शक्यता आहे. बसपा आणि जनजागृती संघाच्या नगराध्यक्ष उमेदवारीचा फटकाही सेना व राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष उमेदवारांना बसण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे रत्नागिरीचा नगराध्यक्ष कोण होणार, याबाबतचे गणित अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे.
रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक येत्या २७ नोव्हेंबरला होत आहे. यावेळी नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेतून होणार आहे. रत्नागिरी शहरातील मतदारांची संख्या ५३ हजार ८१४ इतकी आहे. त्यातील किमान ६० टक्के मतदान यावेळी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी सुमारे ३० हजार एवढे एकूण मतदान अपेक्षित आहे. परंतु प्रत्येक पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे अपेक्षित मतांचे आकडे मात्र मोठे आहेत. त्यामुळे हे मतदान ३६ हजारपर्यंत होईल, असा त्यांचा दावा आहे.
राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार उमेश शेट्ये यांना १५ हजारपेक्षा अधिक मते मिळतील, अशी अपेक्षा आहे. भाजप व शिवसेनेकडूनही असेच दावे केले जात आहेत. अपक्ष व बसपा उमेदवारही रिंगणात आहेत. त्यामुळे या दाव्यांचा हिशेब केला, तर ५० हजार मतदान व्हायला हवे. परंतु तसे होणार नाही. तीनही पक्षांकडून लावली जाणारी ताकद पाहता नगराध्यक्षपदासाठी यावेळी मोठीच झुंज पाहायला मिळणार आहे, असे चित्र दिसत आहे. सेनेच्या प्रचारासाठी राज्य स्तरावरील नेते येणार आहेत. भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा रत्नागिरी दौरा होणार आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस आघाडीच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जिल्हा प्रभारी भास्कर जाधव हे रत्नागिरीचा आखाडा गाजवणार आहेत. त्यामुळे येत्या २० नोव्हेंबरपासून रत्नागिरीत प्रचाराच्या तोफा चांगल्याच धडाडणार असल्याचे संकेत आहेत.
रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामध्ये सेनेचे योगेश तथा राहुल पंडित, राष्ट्रवादीचे उमेश शेट्ये, भाजपचे महेंद्र मयेकर, बसपाच्या सलमा काझी, जनजागृती संघाचे कौस्तुभ सावंत, अपक्ष सुनील जोशी यांचा समावेश आहे.
नगराध्यक्षपदाची मुख्य लढत ही सेना, राष्ट्रवादी व भाजप अशी तिरंगी होणार आहे. या तीनही पक्षात अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात आहे. या पक्षातील इच्छुकांच्या तोंडचा घास पळवल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्याचा फटका तीनही पक्षांच्या नगराध्यक्ष उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. त्याशिवाय हत्तीने केलेला या निवडणुकीतील प्रवेश व जनजागृती संघाने नगराध्यक्ष निवडणुकीत घेतलेली उडी पाहता हे दोन्ही उमेदवार सेना व राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरणार असल्याची चर्चा आहे.
बसपाची रत्नागिरीत ताकद नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळेच त्यांच्या पक्षाकडून १५ प्रभागात एकही उमेदवार उभा करण्यात आलेला नाही. एका उमेदवाराला पाठिंबा देण्यात आला आहे. बसपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सलमा काझी या मूळ राष्ट्रवादीतीलच आहेत. बसपातर्फे भरलेला त्यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद ठरविण्यात आला होता. मात्र, न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्यांची उमेदवारी वैध ठरवण्यात आली. त्या तसेच जनजागृती संघाचे उमेदवार कौस्तुभ सावंत यांच्या उमेदवारीमुळे पक्षीय उमेदवारांना मतांचा फटका बसण्याची शक्यता अधिक असल्याचा राजकीय तज्ज्ञांचा होरा आहे. सलमा काझी या पूर्वी राष्ट्रवादीमध्ये असल्याने त्यांच्या उमेदवारीचा राष्ट्रवादीच्या उमेश शेट्ये यांना फटका बसण्याची शक्यता अधिक आहे.
जनजागृती संघाचे उमेदवार कौस्तुभ सावंत यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेचे उमेदवार राहुल पंडित यांच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यातील सेनेत जुना-नवा वाद अद्याप आहे. अंतर्गत गटबाजी मोठी आहे. राष्ट्रवादीतही एक गट उमेश शेट्येंवर नाराज आहे. त्यामुळे बसपा आणि जनजागृती संघाच्या उमेदवारांची मते ही अन्य उमेदवारांच्या विजयासाठी वा पराभवासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
सेना, राष्ट्रवादीतील या कुरबुरींचा फायदा व्हावा, अशी रणनीती भाजपतर्फे आखली जात आहे. मागील विधानसभा निवडणुकीत शहरात भाजपला एक नंबरचे मतदान होते. ते तसेच राहिल्यास व सेना, राष्ट्रवादीला बसपा आणि अपक्षांचा उपद्रव झाल्यास ते भाजपाच्या पत्थ्यावर पडू शकते.
भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार महेंद्र मयेकर यांना समाजाच्या पाठिंब्याचे कार्ड उपयोगी पडणार की नाही व भाजपअंतर्गत असलेल्या कुरबुरींचा संभाव्य त्रास किती होणार, यावरही महेंद्र मयेकर यांची निवडणुकीतील स्थिती अवलंबून आहे.
या सर्व स्थितीत नगराध्यक्ष नक्की कोण होणार याबाबत राजकीय धुरिणांकडून मांडण्यात येत असलेले गणित आता अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे.
१० हजार मते आवश्यक?
रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत किमान ३० हजार मतदान होणे अपेक्षित असून, जिंकणाऱ्या उमेदवाराला किमान १० हजारांचा आकडा पार करावा लागणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अपक्ष व बसप्
ाा उमेदवार निर्णायक ठरण्याची शक्यता अधिक आहे.
 

Web Title: Municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.