विदेशी नागरिकांवर मनपाची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 12:53 AM2020-03-31T00:53:28+5:302020-03-31T00:53:45+5:30
नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने महापालिका प्रशासनाने अधिक सजग होत विदेशातून आलेल्या ३६७ नागरिकांवर लक्ष केंद्रित केले आहे.
नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने महापालिका प्रशासनाने अधिक सजग होत विदेशातून आलेल्या ३६७ नागरिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. मनपाच्या खास वैद्यकीय पथकामार्फत त्यांची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. दरम्यान, विदेशातून आलेल्या ३६७ पैकी ५५ नागरिकांचा १४ दिवसांचा होम क्वॉरंटाइन कालावधी पूर्ण झाला असून त्यांच्यासह ३११ जण अद्यापही निगराणीखाली आहेत. यापैकी ३०४ जणांच्या घरांवर मनपाच्या वतीने स्टिकर लावण्यात आले आहे.
महापालिकेच्या वतीने गेल्या पंधरा दिवसांपासूनच नाशिकमध्ये आलेल्या विदेशातून आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण केले होते. त्यात ३६७ नागरिक विदेशातून आल्याचे आढळून आले आहे. त्यास सर्वाधिक ९८ नागरिक हे अरब देशातून आल्याचे आढळले तर त्या खालोखाल ३४ नागरिक हे अमेरिकेतून आले आहे. सर्वात प्रथम कोरोना आढळलेल्या चीन देशामधून दोन जण आले आहेत.
महापालिकेने नियमानुसार या सर्वांना होम क्वॉरंटाइन केले तर यातील ५५ जणांना संशयित
म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर अन्य ३३४ जणांना होम क्वॉरंटाइन करत त्यांच्या हातावर शिक्के मारले आहे. शिवाय परिसरातील अन्य नागरिकांनी सजग राहावे यासाठी ३६७ नागरिकांच्या ३०४ घराबाहेर हे घर होम क्वॉरंटाइनखाली आहे, असे स्टिकर लावले आहेत.
या घरांवर पालिकेने पुन्हा लक्ष केंद्रित केले आहे. या घरात देखरेखीखाली असलेल्या सर्वांची वैद्यकीय पथकामार्फत तपासणी केली जात आहे. यातील कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची लक्षणे तर जाणवत नाही ना याची काळजी घेण्याचे आदेश आयुक्त राधाकृष्ण गमेंनी वैद्यकीय विभागाला दिले आहेत.