मनपाचे हॉकर्स झोन कायद्याच्या कचाट्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:32 AM2017-10-23T00:32:38+5:302017-10-23T00:32:49+5:30
शहरातील मुख्य रहदारीचे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेने तयार केलेले हॉकर्स झोन कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात माजी आमदार आणि ज्येष्ठ वकील विलास लोणारी यांनी महापालिकेला नोटीस बजावली आहे. त्यावर प्रशासनाने अद्याप काही उत्तर दिले नसल्याने आता हा वाद न्यायलयात नेण्याची पूर्ण तयारी लोणारी यांनी केली आहे.
नाशिक : शहरातील मुख्य रहदारीचे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेने तयार केलेले हॉकर्स झोन कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात माजी आमदार आणि ज्येष्ठ वकील विलास लोणारी यांनी महापालिकेला नोटीस बजावली आहे. त्यावर प्रशासनाने अद्याप काही उत्तर दिले नसल्याने आता हा वाद न्यायलयात नेण्याची पूर्ण तयारी लोणारी यांनी केली आहे. शहरात बेसुमार वाढत्या अतिक्रमणांचा प्रश्न सोडविण्याची गरज होती. त्यातच उच्च न्यायालयानेदेखील शहरांमध्ये हॉकर्स झोन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका यासंदर्भातील रचना करीत होती. बºयाच भवती न भवतीनंतर ते जाहीर झाले असले तरी आता त्याची अंमलबजावणी अनेक ठिकाणी अडचणीची झाली आहे. विशेषत: महापालिकेने मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवली असली तरी त्यांना नागरी वसाहतीत विशेषत: कॉलनी रोडवर जागा दिल्याने वादाचा विषय ठरला आहे. पंचवटीत चक्क काळाराम मंदिराच्या समोरच हॉकर्सला जागा देऊन महापालिकेने पर्यटनासाठी येणाºयांसाठी अतिक्रमणांचे दर्शन घडविल्याचा आरोप होत आहे. के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या बाजूच्या परिसरात तर तब्बल साडेतीनशे टपºया वसविण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात येत आहे. डिसूझा कॉलनी परिसरात तर चक्क कॉलनी रोडवरच पंधरा टपºया मांडण्यात आल्या आहेत. महापालिकेने रस्ते मुक्त करताना कोणते निकष लावले आहेत, याचाच उलगडा होत नसल्याने येथील रहिवासी आणि माजी आमदार अॅड. विलास लोणारी यांनी महापालिकेला नोटीस बजावून याबाबत विचारणा केली आहे. मात्र, अद्यापही महापालिकेकडून त्यांना प्रत्युत्तर आले नसून त्यांनी आता न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. मनपाच्या अशाप्रकारच्या स्थलांतर योजनांचा आजवरचा अनुभव फार चांगला नाही. महापालिकेने घरकुल योजना राबविताना झोपडपट्टीमुक्त शहर असा संकल्प केला होता. मात्र, घरकुले घेऊन तेथे पोटभाडेकरू ठेवणाºया अनेकांनी मूळ झोपडपट्ट्या सोडल्या नाहीत. त्यामुळे कोठेही झोपडपट्ट्या हटल्याचे चित्र दिसत नाही. हॉकर्स झोन हे महापालिकेने केले खरे, परंतु खरोखरीच संबंधित स्थलांतरित होऊन रस्ते मोकळे होतील काय. असा प्रश्नही या निमित्ताने चर्चिला जात आहे.