मनपा रुग्णालयांना गळती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 12:47 AM2017-08-08T00:47:19+5:302017-08-08T00:47:29+5:30

नाशिक : महापालिकेच्या चारही रुग्णालयांसह बव्हंशी शहरी आरोग्य केंद्राच्या इमारतींना गळती लागलेली आहे तर अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामे झालेली नाहीत. वैद्यकीय विभागाने यासंबंधीचा अहवाल बांधकाम विभागाला सादर करून महिना उलटला तरी अद्याप कामांना गती मिळालेली नाही. त्यामुळे पालिकेची रुग्णालयेच सध्या असुविधांनी आजारी असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

Municipal hospitals leakage! | मनपा रुग्णालयांना गळती !

मनपा रुग्णालयांना गळती !

Next

नाशिक : महापालिकेच्या चारही रुग्णालयांसह बव्हंशी शहरी आरोग्य केंद्राच्या इमारतींना गळती लागलेली आहे तर अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामे झालेली नाहीत. वैद्यकीय विभागाने यासंबंधीचा अहवाल बांधकाम विभागाला सादर करून महिना उलटला तरी अद्याप कामांना गती मिळालेली नाही. त्यामुळे पालिकेची रुग्णालयेच सध्या असुविधांनी आजारी असल्याचे धक्कादायक चित्र आहे. महापालिकेच्या आरोग्य समितीची पहिली सभा नुकतीच झाली. त्यावेळी, सदस्यांनी पावसाळ्यात रुग्णालयांच्या इमारतींना गळती लागल्याच्या तक्रारी केल्या होत्या याशिवाय, ड्रेनेजसह पाणीपुरवठाविषयकही तक्रारी मांडल्या होत्या. दरम्यान, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने रुग्णालयातील असुविधा व समस्यांविषयी महिनाभरापूर्वीच बांधकामसह विद्युत, पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागाला अहवाल सादर केलेला असून, त्याबाबत संबंधित विभागांकडून मात्र अद्याप दखल घेतली गेली नसल्याचे दिसून येते. सर्वाधिक चर्चेत असलेल्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयातील सर्व खोल्यांतील पॅसेज, शस्त्रक्रियागृह याठिकाणी गळती आहे.
पाण्याची टाकी दुरुस्तीची गरज असून, फ्लोरिंगही नव्याने बसविण्याची आवश्यकता आहे. याशिवाय लिफ्ट नादुरुस्त झालेली आहे. सोलर वॉटर हिटरही खराब झालेले आहे. पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनचे स्टॉप कॉक खराब आहेत. ड्रेनेज चोकअप झालेले आहेत. पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयातही भिंतींमध्ये लिकेजेस आहेत. लोखंडी खिडक्या जीर्ण झालेल्या आहेत. विद्युत फिटिंग जुनी झालेली आहे. विद्युत जनित्रांची आवश्यकतामहापालिकेच्या सातपूर, गंगापूर, एम.एच.बी.कॉलनी, उपनगर, भारतनगर, वडनेर दुमाला, गोरेवाडी, दसक पंचक, तपोवन, पंचवटी, सिडको, पिंपळगाव खांब या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात विद्युत जनित्राची नितांत आवश्यकता आहे. त्याबाबतचाही अहवाल वैद्यकीय विभागाने विद्युत विभागाला सादर केलेला आहे. याशिवाय, अनेक ठिकाणी पंखे नादुरुस्त झालेले आहेत. फिटिंग जुन्या झालेल्या आहेत. त्यातही दुरुस्तीची गरज असल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र, अद्याप अहवालानुसार कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. सिडकोतील मोरवाडी रुग्णालयातील पीएनसी वॉर्ड, जनरल वॉर्ड, लेबर रूम, शस्त्रक्रियागृह याठिकाणी गळती आहे. रुग्णालयातील इन्व्हर्टर नादुरुस्त आहे. कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयही असुविधांच्या गर्तेत आहे. याठिकाणी सर्व खोल्यांमध्ये गळती आहे. लिफ्ट नादुरुस्त आहे. ड्रेनेजही चोकअप झालेले आहेत. महापालिकेच्या या चारही रुग्णालयांची अशी स्थिती असताना शहरी आरोग्य केंद्रांनाही विविध समस्यांनी घेरलेले आहे. पावसाळ्याचे दोन महिने शिल्लक आहे. मात्र, बांधकाम विभागाकडून अद्याप गळती थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

Web Title: Municipal hospitals leakage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.