खासगी रूग्णालयांमध्ये महापालिकेची अचानक तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:15 AM2021-03-26T04:15:16+5:302021-03-26T04:15:16+5:30
नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. नाशिक हे उत्तर महाराष्ट्राचे महत्वाचे ठिकाण असून अन्य चार जिल्ह्यांच्या ...
नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. नाशिक हे उत्तर महाराष्ट्राचे महत्वाचे ठिकाण असून अन्य चार जिल्ह्यांच्या तुलनेत आरोग्य सुविधा अधिक असल्याने येथे धुळे, जळगाव, नंदूरबार तसेच अगदी पालघर येथून देखील रूग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे बहुतांश खासगी रूग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी होत आहेत. महापालिकेच्या हेल्पलाईनवर देखील बेडसाठी तक्रारी वाढत असल्याने बुधवारी (दि.२४) आयुक्त कैलास जाधव यांनी बैठक घेतली आणि खासगी रूग्णालयांना अचानक भेटी देण्याच्या सूचना महापालिकेचे ऑडीटर्स आणि अभियंत्यांना दिल्या आहेत.
महापालिकेने सर्व खासगी रूग्णालयांना बेडसची ताजी स्थिती आणि शासन मान्य दर हे दर्शनी भागात लावण्याची सक्ती केली आहे. त्याच बरोबर रूग्णालयात नियुक्त केलेल्या ऑडीटर्सला देखील बेडसंदर्भातील फलक अद्ययावत केला जातो किंवा नाही याबाबत दक्षता घेण्याची सूचना केली आहे. तर अभियंत्यांना अचानक भेटी देऊन रूग्णालायात खरोखरच किती खाटांवर रूग्ण आहेत आणि किती खाटा रिक्त आहेत याची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेने बिल तपासणी ऑडीटर्स नियुक्तीची कार्यवाही या आधीच केली आहे.