त्र्यंबकेश्वरातील आखाड्यांना नगरपरिषदेच्या नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 07:33 PM2021-04-20T19:33:48+5:302021-04-21T00:38:17+5:30
त्र्यंबकेश्वर : हरिद्वार येथील कुंभमेळ्यातून परतणाऱ्या साधुमहंतांनी कोविड चाचणी करूनच आश्रमात प्रवेश करावा, अशी नोटीस त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने येथील प्रत्येक आखाड्यांच्या साधूमहंतांना बजावली आहे. दरम्यान, हरिद्वार कुंभ समाप्तीची घोषणा झाल्याने त्र्यंबकेश्वरमधील अनेक आखाड्यांचे साधू परतीच्या मार्गाला लागले आहेत.

हरिद्वारच्या कुंभमेळ्यात भारतातील तेरा आखाड्यांचे साधुमहंत मिळून जवळपास १५ हजार साधू सहभागी झाले होते. तर सुमारे ५० लाख भाविकांनी स्नान केल्याचे सांगितले जाते. दरम्यान, अनेक साधुमहंतांना कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली. आतापर्यंत तीन शाहीस्नाने पार पडली आहेत, तर साधुमहंतांना कोरोनाची बाधा झाल्याचे पाहून निरंजनी आखाड्याने कुंभमेळ्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आता हे साधू आपापल्या गावी परतत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यात सहभागी होऊन परतणाऱ्या साधुमहंतांसंदर्भात त्र्यंबक नगरपरिषदेमार्फत प्रत्येक आखाड्यांच्या साधुमहंतांना नोटीस बजावण्यात आली आहे. कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या साधुमहंतांनी कोविड चाचणी करूनच आपापल्या आश्रमात प्रवेश करावा, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र कुंभमेळ्याचे ठिकाण असून नाशिकला तीन वैष्णव तथा बैरागी आखाडे आहेत. तर त्र्यंबकेश्वरला दहा आखाडे व नाथ संप्रदायाचा श्री गोरक्षनाथ मठ आहे. सात आखाडे नागा संन्यासींचे तर दोन आखाडे उदासीन व एक निर्मल आखाडा आहे. दरम्यान अजून चौथी पर्वणी बाकी असून दोन उदासीन व निर्मल आखाड्याचे साधू चौथ्या पर्वणीला शाहीस्नान करतात.
आम्ही कोविडमुक्त
त्र्यंबकेश्वर येथील अ.भा. आखाडा परिषदेचे पदाधिकारी व श्री पंचायती आनंद आखाड्याचे श्री महंत शंकरानंद सरस्वती यांच्याशी संपर्क साधला असता तेदेखील त्र्यंबकेश्वरकडे यावयास निघाले आहेत. आपण कोविडमुक्त असल्याचेही त्यांनी सांगितले.