फॉरेस्ट नर्सरी पुलाजवळ महापालिकेचा रस्ता खचला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:41 AM2019-08-17T00:41:03+5:302019-08-17T00:41:26+5:30
महापालिकेच्या वतीने गोदावरी नदीवर फॉरेस्ट नर्सरी पुलाजवळ बांधण्यात आलेल्या पुलाजवळच सुमारे तीस फूट रस्ता खचल्याचा भयंकर प्रकार गुरुवारी (दि.१५) स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी घडला. बरोबर दहा वर्षांपूर्वी म्हणजेच २००८ मध्ये महापुराच्या वेळीदेखील याच ठिकाणी रस्ता खचला होता
नाशिक : महापालिकेच्या वतीने गोदावरी नदीवर फॉरेस्ट नर्सरी पुलाजवळ बांधण्यात आलेल्या पुलाजवळच सुमारे तीस फूट रस्ता खचल्याचा भयंकर प्रकार गुरुवारी (दि.१५) स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी घडला. बरोबर दहा वर्षांपूर्वी म्हणजेच २००८ मध्ये महापुराच्या वेळीदेखील याच ठिकाणी रस्ता खचला होता आणि आता त्याची पुनरावृत्ती झाल्याने महापालिकेच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे.
महापालिकेने या रस्त्याच्या काम हाती घेतल्याचा दावा सुरू केला असला तरी त्यानिमित्ताने रस्ता आणखीनच खचला असून, त्यामुळे दोन दिवसांपासून सुयोजित गार्डनजवळील या पुलापासून मखमलाबादकडे जाणाऱ्या पुलाची वाहतूक पूर्णत: बंद आहे. सदरच्या रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी आणखी सुमारे दोन ते तीन दिवस लागणार असून, त्यानंतरच वाहतूक खुली होईल असे महापालिकेने स्पष्ट केले.
१९९९ मध्ये महापालिकेने गोदावरी नदीवर विविध ठिकाणी पूल बांधले होते. त्याचवेळी या पुलाचे बांधकाम करण्यात आले. वनखात्याच्या फॉरेस्ट नर्सरीकडून मखमलाबाद शिवारात जाण्यासाठी हा पूल बांधण्यात आल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला असला तरी त्याठिकाणी निर्जन भाग असतानाही काही विकासकांनी या भागात जमिनी खरेदी केल्याने हा खास रस्ता तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येते आहे. गोदावरी पुराच्या लघुत्तम पातळीतही हा पूल पाण्याखाली जात असतो. २००८ मध्ये महापूर आला तेव्हा पुलाच्या एका बाजूचा भाग पूर्णत: खचला होता. त्याचीच पुनरावृत्ती आत्ता झाली. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सकाळी ६ वाजेच्या सुमारास हा रस्ता खचल्याचे लक्षात आले. सुदैवाने जीवितहानी टळली. या ठिकाणी रस्ता खचल्याचे लक्षात आल्यानंतर राष्टÑवादीचे रंजन ठाकरे तसेच किशोर शिरसाठ यांनी तातडीने महापालिका, पोलीस खाते यांना कळविले आणि त्याठिकाणी अडथळे टाकून रस्ता अडवला. अन्यथा याठिकाणी अपघात घडण्याची शक्यता वर्तविली जात होती.
दरम्यान, काही वेळेत अचानक रस्ता खचला जाऊ शकतो, ते वरून लक्षात येत नाही. त्यातच याठिकाणी रस्त्याच्या खालून पाइपलाइन जात असल्याने पाणी गळतीतून हा प्रकार घडला असावा, असा प्रशासनाचा कयास केला.
२८ पुलांचे आॅडिट होणार
महापालिकेने गोदावरी आणि नासर्डी नदीवर एकूण ३८ पूल बांधले असून, त्यातील २१ पूल गोदावरी नदीवर आहेत, तर १७ पूल नासर्डी नदीवर आहेत. या सर्व पुलांचे आॅडिट करून किती पूल धोकादायक आहेत याची तपासणी मनपा करणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.