मनपा शाळेचे विद्यार्थी लेझीमने करणार पंतप्रधानांचे स्वागत; खासगी शाळांतील चारशे विद्यार्थी सज्ज
By Suyog.joshi | Published: January 10, 2024 03:03 PM2024-01-10T15:03:33+5:302024-01-10T15:04:03+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी महापालिका, तसेच खासगी शाळांतील चारशे विद्यार्थी सज्ज झाले आहेत.
नाशिक (सुयोग जोशी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी महापालिका, तसेच खासगी शाळांतील चारशे विद्यार्थी सज्ज झाले आहेत. मुलांसाठी केशरी व पांढऱ्या रंगाचा ड्रेस कोड असेल. तर मुली महाराष्ट्राची पारंपरिक वेशभूषा असेलेली नववार साडी परिधान करणार आहे. मनपा शिक्षण विभागाकडून या स्वागत सोहळ्याची जोरदार रंगीत तालीम सुरू आहे.
स्वामी विवेकानंद यांची जंयती दरवर्षी युवा दिन म्हणून देशभरात उत्साहात साजरी केली जाते. त्या दिवशी विविध उपक्रमांतून युवा शक्तीच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणे हा मुख्य उद्देश असतो. यंदा २७ वा युवा महोत्सव आयोजनाचा मान हा नाशिकला मिळाला आहे. पंतप्रधान मोदी यांचा ताफा ज्या मार्गाने जाईल व रोड शो मार्गावर विद्यार्थी लेझीम व ढोल वाजवत त्यांचे कलागुण सादर करतील. त्यासाठी विद्यार्थ्यांची रोज रंगीत तालीम सुरू आहे. विद्यार्थी केशरी व पांढऱ्या रंगाचा ड्रेसकोड परिधान करतील. तर मुली नववारी नेसून मराठी परंपरेचे दर्शन घडवतील. या विद्यार्थ्यांना तपोवनपर्यंत ने -आण करण्यासाठी सिटीलिंक बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या मार्गदर्शनानुसार युवा दिनाची तयारी सुरू आहे. मनपा शाळेतील चारशे विद्यार्थी पंतप्रधान मोदी यांचे लेझीम व ढोल वाजवत स्वागत करतील. या सोहळ्याद्वारे त्यांच्या कलागुणांना वाव दिला जाईल.
- बी. टी. पाटील, शिक्षणाधिकारी, मनपा