स्मार्टरोडच्या सदोष कामांमुळे महापालिका हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 01:06 AM2019-07-31T01:06:27+5:302019-07-31T01:06:45+5:30
स्मार्टरोडच्या कामांमुळे नागरिक तर त्रस्त आहेच, परंतु महापालिकेला सुद्धा अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे. त्र्यंबकनाक्यावरून अशोकस्तंभाकडे जाणाऱ्या जलवाहिनीला कुशन न लावताच ती तशीच ठेवण्यात आली आहे,
नाशिक : स्मार्टरोडच्या कामांमुळे नागरिक तर त्रस्त आहेच, परंतु महापालिकेला सुद्धा अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे. त्र्यंबकनाक्यावरून अशोकस्तंभाकडे जाणाऱ्या जलवाहिनीला कुशन न लावताच ती तशीच ठेवण्यात आली आहे, तर मलवाहिका टाकताना कमी अधिक व्यासाच्या जोडण्यात आल्या आहेत. याशिवाय मुख्य जलवाहिनी (रायझिंग) नळजोडण्या देण्याचा प्रकार घडत असून, या स्मार्ट कारभारामुळे महापालिकेचे अधिकारीही थक्क झाले आहेत.
महापालिकेच्या जलवाहिनीला कुशन्स न टाकता वाकडी टाकण्यात आल्याने कोणत्याही प्रकारचे अवजड वाहन या स्मार्ट रोडवरून गेल्यास जलवाहिनी फुटू शकते असे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे असून संबंधित अधिकारी यासंदर्भात कंपनीला पत्र देणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, कंपनीने मात्र सारवासारवा केली असून, सर्व कामे नकाशा आणि निकषानुसारच होत असल्याचा दावा प्रसिद्धीपत्रकाद्धारे केला आहे. स्मार्टरोडचे वादग्रस्त काम अद्याप पूर्ण झालेले नसून आता ३१ आॅगस्टचा मुहूर्त देण्यात आला आहे. त्यामुळे कंपनी घाईगर्दीत कामे करीत असल्याचा आरोप कंपनीच्या संचालकांनीच केला आहे. स्मार्ट सिटीच्या रस्त्याविषयी सुरुवातीपासूनच ओरड सुरू आहे. महपाालिकेचे अधिकारी उघडरीत्या काही बोलू शकत नसले तरी दर्जा विषयी साऱ्यांचीच ओरड आहे.
हेमलता पाटील यांचे आक्षेप
स्मार्ट सिटी कंपनीच्या कारभाराविषयी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी आक्षेप घेतला असून, त्यात दर्जा आणि गुणवत्तेविषयी शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. कामाचा दर्जा योग्य नसून या रस्त्यावरून गेल्यानंतर कोस्टर राइडचा आनंद मिळतो स्मार्ट हा शब्द केवळ नावालाच असून, नियम निकषानुसार कामे होत नसल्याचा आरोप पाटील यांनी केलाआहे. अनेक प्रश्न पाटील यांनी उपस्थित केले असून, त्याला अनुसरून कंपनीने सारवासारव करणारा खुलासा केला आहे.