टॉवर जप्तीप्रकरणी मनपाची कोंडी
By admin | Published: March 23, 2017 01:06 AM2017-03-23T01:06:35+5:302017-03-23T01:06:47+5:30
नाशिक : महापालिकेने मिळकत कराची थकबाकी असलेल्या मोबाइल कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर दोन मोबाइल कंपन्यांनी त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली.
नाशिक : महापालिकेने मिळकत कराची थकबाकी असलेल्या मोबाइल कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर दोन मोबाइल कंपन्यांनी त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात सुनावणी होऊन महापालिकेने त्वरित संबंधित मोबाइल टॉवरची वीजजोडणी सुरू करून द्यावी व सील ठोकू नये, असे आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे महापालिका कोंडीत सापडली असून, आता थकबाकी वसूल करण्यासाठी घरमालकांकडेच मोर्चा वळविण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. महापालिकेने मिळकत कराची थकबाकी असलेल्या काही मोबाइल कंपन्यांच्या टॉवरविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार महापालिकेने जीटीएल, एटीसी, एअरसेल या कंपन्यांचे मिळून सुमारे २७ मोबाइल टॉवर जप्त करत सील ठोकण्याची कारवाई केली होती. परंतु, महापालिकेच्या या कारवाईविरोधात जीटीएल आणि एटीसी या मोबाइल कंपन्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने संबंधित टॉवर्सचे सील ताबडतोब काढण्याचे आदेश देतानाच वीज मंडळाची जोडणी त्वरेने जोडण्याचेही आदेश दिले. महापालिका केवळ जप्तीची कारवाई करून मालमत्तेचा लिलाव करू शकते, असेही न्यायालयाने महापालिकेला फटकारले आहे. उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर महापालिकेने संबंधित टॉवर्सची वीज जोडणी सुरू करण्याची कार्यवाही केली. मात्र, टॉवर्सच्या कारवाईला त्यामुळे ब्रेक बसणार आहे. टॉवर्स सील करायचे नाही तर मग जप्तीची कारवाई कशी करायची आणि वसुली कशी होणार, या पेचात महापालिका सापडली आहे. (प्रतिनिधी)