नैसर्गिक नाल्यांबाबत ‘नगररचना’ची चुप्पी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:06 AM2017-08-23T00:06:24+5:302017-08-23T00:06:30+5:30

महापालिका हद्दीत असलेल्या नैसर्गिक नाले बुजवून गगनचुंबी इमारती उभ्या राहत असल्याचे आरोप एकीकडे होत असताना शहरातील नैसर्गिक नाल्यांची संकलित माहिती नगररचना विभागाच्या अभिलेखावर उपलब्धच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

'Municipality silence' about natural drains | नैसर्गिक नाल्यांबाबत ‘नगररचना’ची चुप्पी

नैसर्गिक नाल्यांबाबत ‘नगररचना’ची चुप्पी

Next

नाशिक : महापालिका हद्दीत असलेल्या नैसर्गिक नाले बुजवून गगनचुंबी इमारती उभ्या राहत असल्याचे आरोप एकीकडे होत असताना शहरातील नैसर्गिक नाल्यांची संकलित माहिती नगररचना विभागाच्या अभिलेखावर उपलब्धच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शनिवारी (दि.१९) झालेल्या महासभेत सभागृहनेता दिनकर पाटील यांनी नैसर्गिक नाल्यांबाबतची प्रश्नावली दिली होती. करवाढीच्या विरोधात झालेल्या गोंधळामुळे सदर प्रश्नांवर चर्चा होऊ शकली नाही परंतु, पाटील यांना नगररचना विभागाने नैसर्गिक नाल्यांबाबत ज्या पद्धतीने टोलवणारी उत्तरे दिली आहे, त्यातून विभागाचा रामभरोसे कारभार समोर आला आहे. पाटील यांनी शहरात नैसर्गिक नाल्यांची संख्या किती याबाबतचा प्रश्न विचारला होता. मात्र, त्याबाबतची संकलित माहिती उपलब्ध नसल्याचे सांगत विभागाने चुप्पी साधली आहे. याशिवाय, नगररचना विभागाकडे ब्रिटिशकालीन नाल्यांचे नकाशेही उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, मंजूर विकास आराखड्यात नाले दर्शविणारे नकाशे असल्याचे स्पष्ट केले आहे. नैसर्गिक नाल्यांवर अनधिकृत बांधकामांबाबत वेळोवेळी प्राप्त तक्रारीनुसार कारवाई केली जाते, परंतु अशा प्रकारची संकलित स्वरूपाचीही माहिती नगररचना विभागाकडे उपलब्ध नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. मात्र, कोणी तक्रार केल्यास नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, अशी मखलाशीही करण्यात आली आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही
सार्वजनिक उपक्रम व वाचनालय, क्रीडांगण यासाठी आरक्षित जागेवर विनापरवाना धार्मिक स्थळ उभारण्यात आल्याची कबुली नगररचना विभागाने दिलेली आहे. सदर धार्मिक स्थळाचा सन २००९ च्या यादीत समावेश असून, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सदर बांधकाम हे नैसर्गिक नाला बुजवून केल्याचे दिनकर पाटील यांनी यापूर्वी अनेकदा मनपाच्या निदर्शनास आणून दिले आहे. परंतु, अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही.

Web Title: 'Municipality silence' about natural drains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.