महापालिका काहीही सांगेल, पण बेड उपलब्ध पाहिजे ना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:13 AM2021-04-13T04:13:44+5:302021-04-13T04:13:44+5:30
नाशिक : आमच्या ऑक्सिजन बेड्स शिल्लक नाहीत. महापालिकेने काही सांगितले तरी काय उपयोग, बेड पाहिजे ना ...
नाशिक : आमच्या ऑक्सिजन बेड्स शिल्लक नाहीत. महापालिकेने काही सांगितले तरी काय उपयोग, बेड पाहिजे ना उपलब्ध... रुग्णाचा एचआरसीटीचा रेट किती... मग नाही मिळणार बेड...
महापालिकेच्या हेल्पलाईनवर दिलेल्या माहितीच्या आधारे खासगी रुग्णालयांना संपर्क केल्यास अशी उत्तरे मिळतात. पण बेड नाही, असे ‘लोकमत’च्या रिॲलिटी चेकमध्ये आढळले आहे.
शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या हालअपेष्टाही वाढत आहेत. विशेषत: महापालिकेच्या कोविड रुग्णालयात साडेनऊशे रुग्ण उपचार घेत असून, त्यातील पाचशे रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पर्याय नाही. मात्र, खासगी रुग्णालयातदेखील सहजासहजी बेड मिळत नाही. महापालिकेने खासगी रुग्णालयात कोविड बेडची ताजी स्थिती तयार करण्यासाठी सीबीआरएस सिस्टीम तयार केली आहे. त्याआधारे मदत कक्ष तयार करण्यात आला आहे. त्यावर ९६०७६२३३६६ तसेच ९६०७४३२२३३ हे दोन मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. तर ०२५३- २३१७२९२ हा लँडलाईन क्रमांक देण्यात आला आहे. शुक्रवारी पंचवटीतील एका रुग्णाला बेड मिळत नसल्याने खरोखरीच बेड मिळवून देण्यासाठी ‘लोकमत’ने प्रयत्न केले. त्यावेळी पहिला माेबाईल क्रमांक स्वीच ऑफ होता. दुसरा सतत एंगेज होता, तर लँडलाईनवर तीन रुग्णालयांचे संपर्क क्रमांक देण्यात आले. परंतु उपयोग झाला नाही.
इन्फो...
प्रसंग पहिला सिडकोतील एक रुग्णालय
नमस्कार, मी पंचवटीतून बोलतोय, एका कोरोना पेशंटला दाखल करायचे आहे. ऑक्सिजन बेड आहे का?
नाही... आमच्याकडे बेडच शिल्लक नाही.
पण महापालिकेने तुमच्याकडे बेड आहे, असे सांगून नंबर दिला.
त्यांच्याकडे अपडेट माहिती नाही, त्यांना आम्ही कळवले आहे.
इन्फो...
प्रसंग दुसरा अंबड परिसरातील रुग्णालय
नमस्कार, तुमच्याकडे ऑक्सिजन बेड आहे का,
नाही, बेड शिल्लक नाही.
महापालिकेने तुमचा नंबर दिला आहे.
त्यांच्याकडे बेड नसल्याची माहिती पाठवली आहे. पण, महापालिकेत कम्युनिकेशन बरोबर नाही.
इन्फो...
प्रसंग तिसरा पंचवटीतील रुग्णालय
तुमच्याकडे ऑक्सिजन बेड आहे का, महापालिकेने तुमचा नंबर दिला आहे.
रुग्णाचा एचआरसीटी स्कोर किती?
१८ आहे.
मग नको, आमच्याकडे १५ च्या आत स्कोर असेल तरच पेशंट घेतो.
कोट...
महापालिकेच्या हेल्पलाईन दिलेल्या अशा अनेक हॉस्पिटल्सला फोन लावले. परंतु महापालिकेकडे अद्ययावत माहिती नाही, असे सांगून त्यांनी फाेन ठेवून दिला. काहींनी तर ऑक्सिजन बेडच नाहीत, असेही सांगितले. दिवसभर असे अनेक फोन केल्यानंतर अखेरीस मित्र परिवाराच्या ओळखीतून मुंबई नाका येथील एका रुग्णालयात ऑक्सिजन बेड मिळाला.
- रुग्णाचे नातेवाईक, पंचवटी.
कोट...
खासगी रुग्णालयात ऑक्सिजन बेड असल्याची हेल्पलाईनवरील माहिती अत्यंत बरोबर आहे. मात्र, संबंधीत रुग्णालयात ऑक्सिजनच शिल्लक नसेल तर नुसता बेड असून काय उपयोग? त्यादिवशी सर्वच ठिकाणी ऑक्सिजनची टंचाई होती.
- डॉ. बापुसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका.
इन्फो...
१,४१,३२५
शहरातील एकूण कोरोना बाधित
१,१८,९२३
कोरोनामुक्त झालेले रुग्ण
२१,१४८
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण
१२५४
आत्तापर्यंतचे एकूण मृत्यू