महापालिकेचे घरपट्टी, पाणीपट्टीचे उद्दिष्ट अपूर्णच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 01:25 AM2019-03-31T01:25:33+5:302019-03-31T01:25:56+5:30
घरपट्टीत दीडशे कोटी आणि पाणीपट्टीत ५५ कोटी रुपयांचे उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या महापालिकेच्या पदरी निराशा आली असून, घरपट्टीत ११४ कोटी रुपये, तर पाणीपट्टीत ४४ कोटी रुपये शनिवारपर्यंत वसूल झाले आहेत.
नाशिक : घरपट्टीत दीडशे कोटी आणि पाणीपट्टीत ५५ कोटी रुपयांचे उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या महापालिकेच्या पदरी निराशा आली असून, घरपट्टीत ११४ कोटी रुपये, तर पाणीपट्टीत ४४ कोटी रुपये शनिवारपर्यंत वसूल झाले आहेत. रविवारी एका दिवसात मोठ्या प्रमाणात उद्दिष्टपूर्तीची शक्यता नसल्याने आर्थिक नियोजन घसरण्याची शक्यता आहे.
गेले वर्षभर महापालिकेत करवाढीचा विषय गाजला होता. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घरपट्टीत वाढ केली तसेच वार्षिक करमूल्यात आणि मोकळ्या जागेवरील कर आकारणीत करवाढ केली. त्यामुळे वर्षभरात २५६ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु करवाढीस मोठ्या प्रमाणात विरोध झाला. मुंढे यांच्या बदलीनंतर राधाकृष्ण गमे यांनी कार्यभार स्वीकारला आणि करवाढीचा गुंता न सुटल्याने सुधारित उद्दिष्ट दीडशे कोटी रुपयांचे दिले.
परंतु घरपट्टी विभाग तेदेखील पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. शनिवारपर्यंत ११३ कोटी १३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. रविवारचा एक दिवस हातात असला तरी एक दोन कोटी रुपयांचे उत्पन्नच जेमतेम वाढू शकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, पाणीपट्टीसाठी ५५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ४४ कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यामुळे या विभागाचेदेखील उद्दिष्ट पूर्ण होऊ शकलेले नाही.
अधिकारी गायब
सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मार्चअखेरीस वसुलीचा जोर असतानाही महापालिकेत मात्र लेखा विभाग आणि पाणीपट्टी वसुली विभागाचे प्रमुख अनुपस्थित होते. लेखाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी, तर पाणीपट्टी वसुली विभाग ज्यांच्याकडे आहे असे भुगयोचे अधीक्षक अभियंता हे नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर गेल्याचे सांगण्यात आले.