भानामतीसाठी चौथीच्या विद्यार्थ्याची धारदार शस्त्रानं निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 02:12 PM2018-03-28T14:12:37+5:302018-03-28T14:13:46+5:30
मुरबाड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नांदेणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत अज्ञाताकडून इयत्ता चौथीतील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
मुरबाड - मुरबाड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नांदेणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत अज्ञाताकडून इयत्ता चौथीतील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. धक्कदायक बाब म्हणजे भानामतीसाठी या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. सुरज भोईर असे हत्या करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे विद्यार्थी व पालक वर्गात सर्वत्र खळबळ माजली आहे. सुरज भोईर लघवीसाटी बाहेर गेला होता, मात्र तो शाळेत परतलाच नाही. त्याचा शोध घेतला असता शाळेशेजारील ओसाड घरात सुरज रक्ताच्या थरोळ्यात पडलेला आढळला. शाळेतील विद्यार्थ्यांने ही बाब शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिले असता शिक्षकांनी सुरजला उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो बेशुद्ध अवस्थेत असल्यानं शिक्षकांनी पालकांना बोलावून घेतले. यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलीस निरिक्षक अजय वसावे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असून मारेकऱ्यांचा शोधदेखील सुरू करण्यात आला आहे. शासनाने शिक्षण क्षेत्रात आधुनिक बदल घडवून आणण्यासाठी व शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शाळा डिजिटल करण्याची मोहीम हाती घेतली आसली तरी त्या शाळामधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता यावर मात्र कोणत्याही प्रकारची उपाययोजना आखली नसल्याने शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.
ही घटना भयावह असून यामागे गावातीलच एका व्यक्तीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्याची हत्या भानामतीसाठी करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र जोपर्यंत मारेक-याला अटक करत नाही तोपर्यंत सुरजचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्याच्या नातेवाईकांनी घेतला आहे.