‘त्या’ मृत मातेविरुद्ध खुनाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 01:10 AM2021-10-04T01:10:06+5:302021-10-04T01:11:12+5:30
कोरोनामध्ये पाच महिन्यांपूर्वी पतीचे निधन झाल्याने एकाकी आयुष्य जगणे कठीण असल्याची दोन पानी भावनिक सुसाईड नोट लिहून आपल्या सातवर्षीय चिमुकलीला महिलेने गळफास दिल्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. मृत मातेविरुद्ध मुंबई नाका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक : कोरोनामध्ये पाच महिन्यांपूर्वी पतीचे निधन झाल्याने एकाकी आयुष्य जगणे कठीण असल्याची दोन पानी भावनिक सुसाईड नोट लिहून आपल्या सातवर्षीय चिमुकलीला महिलेने गळफास दिल्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. मृत मातेविरुद्ध मुंबई नाका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. विनयनगर परिसरातील सुखसागर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सुजाता प्रवीण तेजाळे (वय ३६) व त्यांची कन्या अनया तेजाळे (७) यांचे मृतदेह शनिवारी (दि.३) आढळून आले होते. घरात पोलिसांना दोन पानी मृत्युपूर्व लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. ही चिठ्ठी सोशल मीडियातून व्हायरल झाल्याने संपूर्ण शहर हळहळले. अत्यंत भावनिक असा आई-मुलीचा संवाद त्या चिठ्ठीतून पुढे आला. प्रवीण तेजाळे यांच्या अचानकपणे झालेल्या मृत्युमुळे जगण्याची इच्छाच उरली नाही, आई-वडिलांशिवाय आणि नवऱ्याशिवाय जगण्याला अर्थच नाही, असा चिठ्ठीचा समारोप केलेला होता. नैराश्यातून सुजाता यांनी आपल्या मुलीला गळफास दिला आणि नंतर स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात मयत सुजाता तेजाळेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.स