खून प्रकरणी तिघा भावंडांना सक्तमजुरी
By Admin | Published: December 28, 2015 10:51 PM2015-12-28T22:51:07+5:302015-12-28T22:52:15+5:30
जिल्हा सत्र न्यायालय : सांजेगाव येथील घटना
नाशिक : किरकोळ कारणावरून ज्ञानेश्वर देवराम गोवर्धने (३०), सोपान देवराम गोवर्धने (२७) आणि नितीन देवराम गोवर्धने (२३) या तिघा भावंडांनी मिळून किरकोळ कारणावरून कुरापत काढून रामहरी पोपटी ढिरेंगे (३९, रा. सांजेगाव) यांच्या डोक्यात फावडा मारून गंभीर दुखापत केली होती. त्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती. न्यायालयाने सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याप्रकरणी तिघा आरोपींना दहा वर्षांची सक्तमजुरीसह दंडाची शिक्षा सुनावली आहे.
१२ फेब्रुवारी २०१४ रोजी इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथे कुरापत काढून ढिरेंगे यांच्यावर जीवघेणा हल्ला करत गंभीर दुखापत केली होती. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता. सदोष मनुष्यवधाप्रकरणी आरोपींना न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि दंड ठोठावला आहे. सांजेगावच्या देवराम गोवर्धने यांच्या घराच्या अंगणात १२ फेब्रुवारी रोजी रात्री हरिनाम सप्ताहानिमित्त भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी रामहरी ढिरेंगे हेदेखील भोजनासाठी तेथे आले होते. दरम्यान, रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ढिरेंगे जेवन करत असताना तिघा आरोपींनी कुरापत काढून त्यांना बेदम मारहाण केली. त्यात ज्ञानेश्वर गोवर्धने याने फावड्याच्या दंडुक्याने ढिरेंगे यांच्या डोक्यात मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. यावेळी ढिरेंगे यांच्या पत्नीसह मुलांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांनाही बेदम मारहाण केली होती. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान १३ फेब्रुवारी रोजी ढिरेंगे यांचा मृत्यू झाला.
तिघा भावंडांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. मोरे यांच्या न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरू होती. सरकारी पक्षाच्या अॅड. वतीने प्रमोद मोरे यांनी अकरा साक्षीदार तपासले. त्यात न्यायालयाने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या कायद्याखाली आरोपींना दहा वर्षांची सक्तमजुरी व तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.