भालूर रस्त्यावरील हत्त्येचा गुन्हा उघड

By admin | Published: January 16, 2017 12:57 AM2017-01-16T00:57:46+5:302017-01-16T00:57:58+5:30

मनमाड : स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

The murder of Haldia on Bhalur road exposed | भालूर रस्त्यावरील हत्त्येचा गुन्हा उघड

भालूर रस्त्यावरील हत्त्येचा गुन्हा उघड

Next

मनमाड : मनमाड-भालूर रस्त्यालगत सटाणे शिवारात एका अनोळखी इसमाची दगडाने ठेचून हत्त्या केल्याच्या घटनेचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळाले असून संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, अनोळखी मयताची ओळख पटली आहे.
भालूर रस्त्यावरील शिवनेरी हॉटेलच्या जवळील नाल्यात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. मयताचा गळा चिरून व दगडाने ठेचून हत्त्या केली असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी मनमाड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा अधीक्षक अंकुश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. घटनेच्या दिवशी कऱ्ही गावाकडील रस्त्यावर दोन इसम दारूच्या नशेत पायी जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. या गावात शेततळ्याच्या कामासाठी काही मजूर आले होते. याबाबत चौकशी करून पोलिसांनी वडनेर खाकुर्डी, ता. मालेगाव येथून संशयित आरोपी महेंद्र निंबा सोनवणे (२७) यास ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने मयतास जिवे ठार मारल्याची कबुली दिली. मयत भाऊसाहेब दशरथ चव्हाण (४५) रा. धोडंबे, ता. चांदवड हा मिस्त्री काम करत होता. मुलीसाठी मुंबई येथून स्थळ पाहून आल्यानंतर मनमाड येथे आरोपीशी त्याची भेट झाली. त्याच्या खिशात असलेले पैसे पाहून त्यास दारू पाजून अज्ञात ठिकाणी नेऊन जिवे ठार मारल्याची कबुली सोनवणे याने दिली. आरोपीकडून एक धारधार कटर, रोख रुपये व मोबाइल हस्तगत करण्यात आले असून, पुढील तपासासाठी मनमाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, उपनिरीक्षक बालाजी मुसळे, भरत चौधरी, अरुण पगारे, सतीश जाधव, किरण मोरे, विलास शिरोळे, सुहास छत्रे, सुनील अहिरे, राजू मोरे, भरत कांदळकर, गणेश नरोटे यांच्या पथकाने सदरची कार्यवाही केली. (वार्ताहर)

Web Title: The murder of Haldia on Bhalur road exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.