जंगली श्वापदाच्या हल्ल्यात बकरी ठार
By admin | Published: April 7, 2017 12:58 AM2017-04-07T00:58:17+5:302017-04-07T00:58:41+5:30
लोहोणेर : येथील एका शेतकऱ्याच्या मालकीची बकरी जंगली श्वापदाने फस्त केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती व्यक्त केली जात असून, या श्वापदांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
लोहोणेर : येथील एका शेतकऱ्याच्या मालकीची बकरी जंगली श्वापदाने फस्त केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती व्यक्त केली जात असून, या श्वापदांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
लोहोणेर परिसरातील काळवट धरण शिवारातील शेतकरी मधुकर मोहन सोनवणे यांच्या मालकीची सुमारे ४ ते ५ हजार रुपये किमतीची बकरी मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास जगली श्वापदाने शेजारील कांद्याच्या शेतात नेऊन फस्त केली. सकाळी उठल्यानंतर बाहेर बांधलेल्या तीन बकऱ्यांपैकी एक बकरी गायब असल्याचे सोनवणे कुटुंबाच्या लक्षात आले. त्यांनी आजूबाजूला पाहणी केली असता त्यांच्या मालकीच्या कांद्याच्या शेतातील पीक जमिनीवर पडलेले दिसले व काही ठिकाणी या जगली श्वापदाच्या पावलाचे ठसे तर बकरीचे रक्तही पडलेले दिसले. परिसरातील काही शेतकऱ्यांनी बिबट्याचे अथवा वाघाचे दर्शनही झाले असून, ही श्वापदे जोडीने या भागात वावरत असल्याचे या परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे या परिसरातील शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी लोहोणेर येथील युवक कैलास शेवाळे हे मालेगाव येथून येत असताना लोहोणेर परिसरात या जगली श्वापदांनी दर्शनही दिल्याचे सांगितले. (वार्ताहर)