मालेगावी मजुराचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 01:16 PM2021-05-26T13:16:41+5:302021-05-26T13:16:52+5:30
मालेगाव : म्हाळदे शिवारातील खासगी कत्तलखान्यात काम करणाऱ्या फिरोज जाफर शेख (३६) रा. गवंडी, मुंबई याचा तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून करणाऱ्या आसाम येथील परप्रांतीय संशयित मजुराविरूद्ध पवारवाडी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालेगाव : म्हाळदे शिवारातील खासगी कत्तलखान्यात काम करणाऱ्या फिरोज जाफर शेख (३६) रा. गवंडी, मुंबई याचा तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून करणाऱ्या आसाम येथील परप्रांतीय संशयित मजुराविरूद्ध पवारवाडी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृत फिरोज याचा भाऊ परवेझ जाफर शेख याने पवारवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवारी मध्यरात्री १२ ते दीड वाजेच्या सुमारास हा खूनाचा प्रकार घडला. फिरोज व संशयित आसाम येथील परप्रांतीय मजूर एका खोलीत राहत होते. आपसात वाद झाल्याने संशयित परप्रांतीय तरूणाने फिरोज याच्या छातीवर तीक्ष्ण हत्याराने वार केला. यात त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नाजीर शेख, पोलीस उपनिरीक्षक भामरे, मोरे, हवालदार बब्बू सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. येथील सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. प्रारंभी पवारवाडी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती; मात्र परवेझ शेख यांच्या फिर्यादीवरुन खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिरोज हा गेल्या चार महिन्यांपासून खासगी कत्तलखान्यात कामाला लागला होता. त्याच्या पत्नीचा दोन वर्षापुर्वी रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. त्याच्या पश्चात दोन मुले व दोन मुली, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख हे करीत आहेत.