फुलेनगर : चारित्र्याच्या संशयावरून नवविवाहितेचा पतीने केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 04:30 PM2020-07-18T16:30:46+5:302020-07-18T16:31:14+5:30
शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत असून तिचे गावाकडे असलेल्या मुलाबरोबर प्रेम संबंध असल्याने रागाच्या भरात...
नाशिक : पंधरवड्यापूर्वी विवाह झालेल्या नवविवाहितेने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिचा गळा आवळून तसेच तोंडावर दगडी पाटा मारून खून केल्याची घटना शनिवारी (दि.१८) पहाटेच्या सुमारास फुलेनगरातील मुंजोबा गल्लीत घडली . घटनेनंतर संशयित आरोपी पती सागर पारधीने स्वतः पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली.
या घटनेत आरती सागर पारधी (१८) हिचा मृत्यू झाला. पत्नीचा खून केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित आरोपी पती सागर गणपत पारधी याला अटक केली आहे. विशेष म्हणजे अवघ्या पंधरवड्यापूर्वी सागर आणि आरतीचा विवाह झाला होता. विवाह झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून दोघांमध्ये वाद सुरू झाले. काल शनिवारी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. त्यातून संशयित सागरने पत्नीला शिवीगाळ करत सुरुवातीला तिचा गळा आवळला व त्यानंतर तिच्या डोक्यात दगडी पाटा टाकला तोंडावर वर्मी घाव बसल्याने आरती जोराने ओरडली. त्यावेळी संशयिताच्या आईने तत्काळ वरच्या खोलीत धाव घेतली असता त्यांची सून आरती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. त्यानंतर मुलगा सागरला विचारणा केली असता त्याने आरती शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत असून तिचे गावाकडे असलेल्या मुलाबरोबर प्रेम संबंध असल्याने रागाच्या भरात "मी तिचा गळा आवळला व तिच्या तोंडावर दगडी पाटा मारला"असे सांगितले.
सदर घटनेनंतर जखमी आरतीला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. सकाळी संशयित आरोपी पती सागरने पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेत झाल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिल्याने पोलिसही काही काळ चक्रावून गेले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी कर्मचारी पाठवून खात्री केली असता घटनास्थळी दगडी पाटा आढळून आल्याने संशयिताने खून केल्याचे उघडकीस आले.