कुस्तीपटू भुषण लहानगेची हत्या; बंदुकीचा फायरनंतर धारधार शस्त्राने वार
By दिनेश पाठक | Published: May 10, 2024 06:11 PM2024-05-10T18:11:31+5:302024-05-10T18:12:34+5:30
नाशिक जवळील घटना; चार मारेकरी हल्ला करून फरार
दिनेश पाठक, नाशिक: कुस्तीपटू भुषण दिनकर लहानगे (४०) यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी बंदुकीने फायर करून नंतर धारधार शस्त्राने वार केला. यात भुषणचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.१०) दुपारी तीन वाजेच्या सुमारास नाशिक-इगतपुरी महामार्गावरील विल्होळीनजीक राजूर फाटा येथे पंजाबी डाब्याजवळ घडली. ऐन अक्षय्य तृतीयेच्या दिवशीच हत्या झाल्याने खळबळ उडाली.
भुषणचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला होता. दोन मारेकरी दुचाकीवर आले होते. तर दोन मारेकरी घटनेच्या ठिकाणी दबा धरून बसले हाेते. दुचाकी (क्र.एम.एच.१५ इ.७६७४) सोडून मारेकरी पसार झाले. भुषणला रस्त्यात अडवून पहिले त्याच्या पाठीवर दोन गाेळ्या फायर केल्या. नंतर धारधार शस्त्राने त्याच्यावर वार केले. आरोपींनी तेथून इगतपुरीच्या दिशेने पळ काढला. हत्या का आणि कशामुळे झाली? याचे कारण समजू शकले नाही. भुषण हा इगतपुरी तालुक्यात प्रसिद्ध कुस्तीपटू म्हणून प्रसिद्ध होता. तो शेती तसेच दुधाचा व्यवसाय करीत होता.
म्हशींसाठी चक्कीतले पीठ घेऊन तो आपल्या गावी सांजेगाव येथे निघाला होता. सकाळपासून तो नाशिकमध्ये आला होता. काही बाजार करून व शहरातील सिडको येथील चक्कीतून म्हशींना पीठ घेऊन तो दुचाकीने जात होता. त्याच्या प्रतिक्षेत असलेल्या संशयितांनी त्याचा रस्ता अडवून त्याची हत्या केली. भुषणने जिल्हा, विभाग स्तरावर कुस्ती स्पर्धेत अनेक पारितोषिके मिळविले हाेते. वाडीवऱ्हे अन् ग्रामीण पोलिस घटनास्थळी हजर झाले. भुषणचा मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात आणण्यात आला. तेथे त्यावर शवविच्छेदन करण्यात आले. तेव्हा भुषणचे नातेवाईक, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित हाेते.