शेतीच्या वादातून एकाचा खून; बापलेकाविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 06:00 PM2021-01-17T18:00:52+5:302021-01-17T18:01:52+5:30
सटाणा : शेतीच्या सामायिक बांधावर बैल चारण्यावरून कुरापत काढून झालेल्या वादात एकाच्या डोक्यात फावड्याने हल्ला करून खून केल्याची घटना बागलाण तालुक्यातील पिपंळदर येथे उघडकीस आली. याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ते फरार आहेत.

शनिवारी पिंपळदर येथील संजय नामदेव पवार (४६) हे त्यांच्या शेतीच्या बांधावर बैल चारण्यासाठी खुंटी ठोकत असताना सामायिक बांधावरील गवत पाहून संशयित विक्रम दोधा पवार व त्यांच्या पत्नी पमाबाई पवार यांनी हे गवत सामायिक बांधावर टाकू नका. त्यामुळे जमीन खराब होते अशी कुरापत काढून विक्रम व त्यांचा मुलगा विश्वनाथ पवार यांनी संजय पवार यांच्यावर लोखंडी फावडे व पाईपने पाठीवर, डोक्यावर हल्ला केला. संजय पवार यांच्या डोक्याला वर्मी घाव लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी शहरातील डॉ. जगताप यांच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अति रक्तस्राव झाल्याने ते कोमात गेले. पुढील उपचारासाठी नाशिक येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, रविवारी दुपारी एक वाजता उपचारादरम्यान संजय यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात विक्रम व विश्वनाथ पवार या बापलेकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील हे करीत आहेत.