मालेगावी भांडण सोडविण्यावरून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 12:30 AM2020-02-24T00:30:47+5:302020-02-24T00:56:47+5:30
घराशेजारी होणारे भांडण सोडविण्यासाठी आल्याच्या रागातून एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना गवळीवाडा भागात घडली. याप्रकरणी मयताची पत्नी रूकसाना निकहत ताहीर हुसेन अख्तर हिने शहर पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी संशयित आरोपी शेख रफीक शेख इस्माईल ऊर्फ राजा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मालेगाव : घराशेजारी होणारे भांडण सोडविण्यासाठी आल्याच्या रागातून एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना गवळीवाडा भागात घडली. याप्रकरणी मयताची पत्नी रूकसाना निकहत ताहीर हुसेन अख्तर हिने शहर पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी संशयित आरोपी शेख रफीक शेख इस्माईल ऊर्फ राजा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
फिर्यादीत म्हटले आहे की, शहरातील गवळीवाडा भागात शनिवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास फिर्यादी रुकसाना निकहत ही पती ताहीर हुसेनशी बोलत असताना शेजारी राहणारा शेख रफीक शेख इस्माईल ऊर्फ राजा हा त्याची मुलगी सना हिला मारहाण करीत करीत असल्याने जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला. म्हणून पतीसह रुकसाना घराबाहेर आले. ताहीर हुसेन अख्तर शमसुजमा (४१) हे संशयित आरोपी रफीक शेख याच्याकडे पाहता असताना भांडण सोडविण्यासाठी आल्याचा त्यास संशय आला. तो म्हणाला तू आमच्या भांडणात पडू नको तेव्हा मयत ताहीर हुसेन यांनी त्यास सांगितले की, तुझ्या भांडण्याचा आणि आरडाओरडीचा आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना त्रास होतो. असे सांगण्याचा राग आल्याने रफीक ताहीर हुसेनच्या अंगावर धावून आला आणि शिविगाळ करू लागला. त्यामुळे गल्लीतील शायदा निहाल अहमद आणि शबाना माजीद अख्तर तेथे आल्या. त्यांनी शिविगाळ करू नको म्हणून आरोपी रफीक शेख यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने संशयित आरोपी रफीक शेख याने कमरेला लावलेला चाकू काढून ताहीर हुसेन अख्तर याच्या पोटात खूपसला. पतीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून रुकसाना निकहत सोडविण्यासाठी गेल्या असता आरोपीने त्यांच्या तोंडावर मारून धक्का देत पळून गेला. गल्लीतील जावीद अख्तर मेहमूद अहमद आणि अन्सारी नासिर अहमद यांनी ताहीर हुसेनला उपचारार्थ सामान्य रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. शहर पोलिसांनी संशयित शेख रफीक शेख इस्माईल उर्फ राजा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक देशमुख करीत आहेत.
शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास बजरंगवाडी येथे एकास गावठी कट्ट्याचा धाक दाखवत मारहाण करून दम देण्यात आला. या घटनेतील संशयिताना अटक करण्यापूर्वी २४ तासात अत्यंत क्षुल्लक कारणावरून एका यंत्रमाग मजुराची हत्या झाली.