अनैतिक संबंधातून हत्या : सटाण्यातील खुनाचा छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 08:17 PM2020-05-15T20:17:43+5:302020-05-15T20:18:02+5:30
मयत राजू सरदार यांच्या मोबाईल क्रमांकाची माहिती नाशिक सायबर पोलिसांना दिली असता रात्री अकरा वाजता त्यांचा मोबाईल बंद झाला होता.
सटाणा : शहरासह बागलाण तालुक्यात खळबळ उडवून देणाऱ्या खुनाच्या घटनेचा तपास पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात लावला असून याप्रकरणी प्रेयसी व प्रियकराला अटक करण्यात आली आहे. हर्षदा अरुण सोनवणे (वय 26 रा. चौगाव रोड, सटाणा) व रवि सुरेश खलाले (वय 36 रा.मंगल नगर, सटाणा) असे प्रेयसी व प्रियकराचे नाव आहे.
सटाणा पोलिसांनी आरोपी हर्षदा सोनवणे हिला सटाणा शहरातून तर प्रियकर आरोपी रवी खलाले याला धुळे येथून अटक करण्यात आल्याची माहिती सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. काल 14 मे रोजी सकाळी सात वाजता दोधेश्वर घाटात इंडिगो मांझा कारमध्ये एक मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्याची माहिती सटाणा पोलिसांना मिळाली होती. ही कार सटाणा शहरातील सम्राट म्युझिकलचे संचालक राजू सरदार यांची असल्याची खात्री होताच सटाणा पोलिसांनी राजू सरदार यांच्या कुटुंबीयांना याची माहिती देत घटनास्थळावर पाचारण केले होते. मयत राजू सरदार यांच्या शरीरावरील जखमा आणि इतर परिस्थिती पाहता त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. राजू सरदार यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार सटाणा पोलिसांनी 302 कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल केला होता. घटनास्थळावर अप्पर पोलीस अधिक्षक संदीप घुगे, उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत शिंदे यांनी भेट देत पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्याकडे तपासाची सूत्रे दिली होती.
मयत राजू सरदार यांच्या मोबाईल क्रमांकाची माहिती नाशिक सायबर पोलिसांना दिली असता रात्री अकरा वाजता त्यांचा मोबाईल बंद झाला होता. सायबर पोलिसांनी मोबाईल बंद होण्यापूर्वी त्यांच्या संपर्कात कोण आले याचा सखोल अभ्यास करून शेवटी आलेल्या कॉलची तपासणी केली असता सटाणा शहरातील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा हा फोन असल्याची खात्री सटाणा पोलिसांना झाली. या अल्पवयीन विद्यार्थ्याकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता या विद्यार्थ्यांची मामी हर्षदा अरुण सोनवणे (वय 26) ही माझा मोबाईल रात्री साडे दहा वाजल्यापासून ताब्यात घेऊन घराबाहेर गेल्याची माहिती त्याने पोलिसांना देत रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास माझा मोबाईल घरी घेऊन आल्याची माहिती या अल्पवयीन विद्यार्थ्याने पोलिसांना दिल्याने पोलिसांनी हर्षदा सोनवणे तिला ताब्यात घेतले.
आरोपी हर्षदा सोनवणे हिच्याकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता सन 2013 पासून तिचे रवि सुरेश खलाले (रा.मंगल नगर,सटाणा.व्यवसाय टुरिस्ट कार चालक) याच्याशी प्रेम संबंध असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. गत अडीच महिन्यांपासून मयत राजू सरदार हा मला सतत फोन करून त्रास देत असल्याची तक्रार प्रियकर रवी खलालेकडे करून दोघांनी संगनमताने याचा खून केल्याची कबुली हर्षदा सोनवणे हिने पोलिसांना दिली.
...असा केला खून
प्रियकर रवी खलाले व प्रेयसी हर्षदा सोनवणे या दोघांनी राजू सरदार यांच्या खुनाचा कट रचला. 13 मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हर्षदा सोनवणे हिने राजू सरदार यांना फोन करून नामपुर रोडच्या बागलाण अकॅडमी जवळ बोलवले. राजू सरदार त्यांच्या इंडिगो मांझा कारने बागलाण अकॅडमी जवळ पोहोचले असता हर्षदा सोनवणे त्यांच्या कारमध्ये पुढील शिकवून बसली. तेथेच प्रियकर रवि अंधारात लोखंडी टॉमीसह दबा धरून उभा होता. हर्षदा हिने राजू सरदार यांना कार दोधेश्वर-कोळीपाडा रोड कडे घ्यायला लावली. कोळीपाडा रोडवर कार आली असता हर्षदा हिने कार उभी करायला लावली. कार उभी करून आरोपी हर्षदा सोनवणे व राजू सरदार बाहेर येताच मागून पल्सर वर आलेल्या रवी खलाले याने लोखंडी टॉमीच्या साह्याने राजीव सरदार यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला. खून केल्यानंतर दोघांनी राजू सरदार यांना मृत अवस्थेत उचलून त्यांच्याच कारमधील मागील सीटवर त्यांचा मृतदेह ठेवला.