माळेगाव औद्योगिक वसाहतीत युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:11 AM2021-06-22T04:11:31+5:302021-06-22T04:11:31+5:30
सोमनाथ अशोक जाधव ऊर्फ गुड्ड्या (२१) रा. माळेगाव असे मृत युवकाचे नाव आहे. मयत व खून करणारा संशयित अल्पवयीन ...
सोमनाथ अशोक जाधव ऊर्फ गुड्ड्या (२१) रा. माळेगाव असे मृत युवकाचे नाव आहे. मयत व खून करणारा संशयित अल्पवयीन सोळा वर्षीय मुलगा हे दोघेही माळेगाव येथील रहिवासी आहेत. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मयत सोमनाथ उर्फ गुड्ड्या अशोक जाधव व संशयित अल्पवयीन मुलगा यांच्यात मैत्री होती. काही दिवसांपासून त्यांच्यात आपसात वाद निर्माण झाले होते. त्यामुळे संशयित अल्पवयीन मुलाच्या मनात त्याच्याविषयी राग असल्याचे समजते. अल्पवयीन मुलगा हा सोमनाथ ऊर्फ गुड्ड्यावर पाळत ठेवून होता. सोमवारी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास जिंदाल कंपनीच्या परिसरात सुनसान जागा पाहून संशयित मुलाने सोमनाथ जाधव याला गाठले व त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यात गुड्ड्याच्या मानेवर, गळ्यावर, डोक्यावर वर्मी घाव बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनेनंतर संशयित अल्पवयीन मुलगा स्वत:हून एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर होऊन केलेल्या कृत्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
इन्फो
पोलिसांकडून तपास सुरू
पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश गुरुड, हवालदार गौरव सानप, शशिकांत निकम, हिरामण बागूल, तुषार मरसाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत सोमनाथ उर्फ गुड्ड्या जाधव याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी नगरपालिका रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी अल्पवयीन मुलासोबत यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याची माहिती पोलीस घेत होते. रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.