सिडको चौपाटीजवळ तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 01:47 AM2021-07-29T01:47:47+5:302021-07-29T01:48:17+5:30
स्टेट बँक चौकातील चौपाटीजवळच बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास फरशीच्या तुकड्याने डोक्याला जबर मारहाण करून खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
सिडको : येथील स्टेट बँक चौकातील चौपाटीजवळच बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास फरशीच्या तुकड्याने डोक्याला जबर मारहाण करून खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले असल्याचे अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांनी सांगितले. नाशिक रोड देवळाली गाव येथील रहिवासी असलेल्या प्रसाद भालेराव यांचा या खून झाला असून, पोलिसांनी घटना घडल्यानंतर काही वेळातच जुने सिडको लेखानगर वसाहतीत राहणाऱ्या अनिल दशरथ पाटेकर उर्फ गिन्या याला पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. यातील दुसरा संशयित नितीन दांडेकर हा मात्र फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन दिवसांपूर्वीच सिडकोतील बडदेनगर ते पाटीलनगर या रस्त्यावर दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने एकास बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले होते.
बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सिडकोतील स्टेट बँक चौक येथील सोनाली मटन-भाकरीजवळ दोघा संशयितांनी एकाच्या डोक्यात फरशीच्या तुकड्याने जबर मारहाण केली. डोक्याला मार लागल्याने देवळाली गाव येथील प्रसाद भालेराव यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती कळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी व पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाले.
खून झालेले प्रसाद भालेराव हे देवळाली गाव राजवाडा येथील रहिवासी असून, ते नाशिक रोड रेल्वे स्थानकावर पार्सल विभागामध्ये सामान वाहतुकीचे काम करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
इन्फो
प्रसाद भालेराव यांचा खून केल्यानंतर अनिल पिटेकर व नितीन दांडेकर या दोघांनी पलायन केले. यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे व मुरली जाधव यांनी दुचाकीवर त्यांचा शोध घेत अनिल पिटेकर याला पकडले. दुसरा संशयित नितीन दांडेकर हा मात्र फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.