संगीत तुलसी रामकथेचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 01:34 AM2019-08-15T01:34:34+5:302019-08-15T01:35:00+5:30
नि:स्वार्थ भक्ती हाच परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग होय. राम व कृष्ण या दोन व्यक्तींना आपण मंदिरात कोंडून न ठेवता आचरणात आणले पाहिजे, असे मत रामकथा प्रवक्ते समाधान महाराज शर्मा यांनी व्यक्त केले.
सिडको : नि:स्वार्थ भक्ती हाच परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग होय. राम व कृष्ण या दोन व्यक्तींना आपण मंदिरात कोंडून न ठेवता आचरणात आणले पाहिजे, असे मत रामकथा प्रवक्ते समाधान महाराज शर्मा यांनी व्यक्त केले.
पवननगर येथील लोकनेते नानासाहेब उत्तमराव पाटील स्टेडियम येथे आयोजित संगीत तुलसी रामायन कथा प्रवचनाच्या समारोपाप्रसंगी शर्मा बोलत होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील, लोकनेता प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद घुगे, भाजपा युवा मोर्चाचे चिटणीस अमोल पाटील, राधिका बिल्डकॉनचे संचालक राधेय मालपाणी, नगरसेवक कावेरी घुगे आदी उपस्थित होते. महाराज शर्मा पुढे बोलताना म्हणाले कृष्ण चरित्र हे श्रवणीय असून, प्रभुराम चरित्र हे आचरणीय आहे. दोन वस्तूंचा काला शास्त्राला अपेक्षित नसून जीव व शिव ऐक्याचा काला शास्त्राला अपेक्षित आहे. महाराष्टÑ हा साधू संतांच्या आचार-विचारांवर उभा असून, विश्व माउली ज्ञानेश्वरांचे गुरू श्री निवृत्तिनाथ महाराजांचा, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पंचवटी व त्र्यंबकेश्वराच्या ज्योतिर्लिंगाचा हा पवित्र व पुनित परीसर आहे. सतसंगामध्ये अंत:करणात सत्य प्रस्थापित व्हायला हवे. धार्मिकतेच्या नावाखाली समाजामध्ये थोतांड वाढता कामा नये. कथा-कीर्तन हे माध्यम अतिशय संस्कार रुजविण्यासाठी प्रभावी माध्यम आहे. एखादी गरिबांची अथवा अनाथ मुलगी सक्षम कुटुंबाने दत्तक घेउन कन्यादान करावे यातच खरा परमार्थ दडला असल्याचेही समाधान महाराज शर्मा यांनी सांगितले.