जागा संपुष्टात: मुस्लीम कब्रस्तानांमध्ये दफनविधीचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 06:19 PM2020-07-04T18:19:51+5:302020-07-04T18:25:50+5:30
कोविड-१९ने बाधित मृतदेह दफनविधी करण्यासाठी किमान सात फूटांची कबर खोदावी लागत असल्यामुळे कब्रस्तानातील जमीनीची माती ढासळून अन्य कबरी जमिनीत धसत असल्याचे कबर खोदणारे जहांगीर कब्रस्तानमधील सहायक फिरोज शेख यांनी सांगितले.
नाशिक : शहर व परिसरात मागील दीड ते दोन महिन्यांपासून कोरोनाबाधित मुस्लीम रूग्णांसह हृदयविकार व अन्य नैसर्गिक कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शहराच्या जुने नाशिक, वडाळागाव परिसरातील कब्रस्तानांमधील जागा आता अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे महापालिका व जिल्हा प्रशासनाने तत्काळ कन्नमवारपूलालगत व वडाळागावातील शंभरफूटी रस्त्यालगत मुस्लीम दफनभूमीसाठी आरक्षित जागेवर दफनभूमीला परवानगी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शहरातील मुस्लीम लोकसंख्या लक्षात घेता अद्याप महापालिकेकडून कोठेही मुस्लीम कब्रस्तानकरिता जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. मुस्लीम कब्रस्तान हे सर्व खासगी विश्वस्त मंडळांकडून खरेदी केलेल्या जागेतच आहेत. जुन्या नाशकातील रसुलबाग, जहांगीर हे दोन प्रमुख कब्रस्तान शेकडो वर्षे जुने झाले असून त्यामधील जागा अत्यंत भुसभुशीत झाली आहे. तसेच या ठिकाणी अद्याप हजारोवेळा कबरींचे खोदकाम केले गेले आहे. यामुळे कब्रस्तानांमधील जागा आता अपुरी पडू लागली आहे.
मागील दीड महिन्यांपासून या दोन्ही कब्रस्तानांसह पीरजादा, काजी खानदानसाठी राखीव असलेल्या खडकाळी व पखालरोडवरील कब्रस्तानांसह वडाळागावातील जामा गौसिया कब्रस्तानमध्ये सुध्दा मोठ्या संख्येने कोरोनाबाधित मुस्लीम मृतदेहांचे दफनविधी करण्यात आले आहेत. कोविड-१९ने बाधित मृतदेह दफनविधी करण्यासाठी किमान सात फूटांची कबर खोदावी लागत असल्यामुळे कब्रस्तानातील जमीनीची माती ढासळून अन्य कबरी जमिनीत धसत असल्याचे कबर खोदणारे जहांगीर कब्रस्तानमधील सहायक फिरोज शेख यांनी सांगितले.
यामुळे या अपात्कालीन परिस्थितीत मुस्लीम दफनविधीसाठी आरक्षित असलेल्या जागेसंदर्भात तत्काळ शासनाने निर्णय घेऊन त्या ठिकाणी कोरोनाबाधित मृतदेह दफनविधीला परवानगी द्यावी, अशी मागणी शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, सय्यद तुराबअली शाह संस्थेचे दफनविधी सहायक रिजवान खान, रफिक साबीर यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.मुस्लीमबहुल भागात वाढला मृत्यूदर
कोरोना आजाराचे संक्रमण जुने नाशिक, पखालरोड, वडाळारोड या भागात सर्वाधिक वाढले. तसेच सध्या वडाळागावातील कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात आले असले तरी नैसर्गिक व अन्य कारणांमुळे वडाळ्यातही मागील काही दिवसांपासून सातत्याने मुस्लीमांचा मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. थोड्याफार फरकाने अशीच स्थिती जुने नाशिक भागाची आहे.