कुठल्याही अफवा, आमीषाला बळी न पडता मुस्लीमांनी मतदान करावे : शहर-ए-खतीब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 02:11 PM2019-04-24T14:11:27+5:302019-04-24T15:17:13+5:30
निवडणुकीच्या वातावरणात धर्मगुरू या नात्याने राजकिय पक्षांचे उमेदवार, पदाधिकारी भेटीगाठीसाठी येत आहे; मात्र याचा असा कुठलाही अर्थ होत नाही, की मुस्लीम समाजाने एका विशिष्ट अशा राजकिय पक्षाला पाठिंबा दिला
नाशिक : भारतीय नागरिक म्हणून मतदान करणे हे प्रत्येक मुस्लीमाचे कर्तव्य आहे. भारतीय लोकशाहीला बळकट करण्यासाठी तसेच देशाच्या प्रगतीसाठी संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क प्रत्येक प्रौढ मुस्लीम नागरिकाने सद्सद्विवेकबुध्दीने बजवावा. निवडणूकीदरम्यान पसरविल्या जाणाऱ्या कुठल्याही अफवा किंवा आमीषाला बळी पडू नये, असे आवाहन मुस्लीम समाजाचे प्रमुख नेते व धर्मगुरू अलहाज हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांनी जाहीर प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
निवडणुकीच्या वातावरणात धर्मगुरू या नात्याने राजकिय पक्षांचे उमेदवार, पदाधिकारी भेटीगाठीसाठी येत आहे; मात्र याचा असा कुठलाही अर्थ होत नाही, की मुस्लीम समाजाने एका विशिष्ट अशा राजकिय पक्षाला पाठिंबा दिला किंवा आमच्याकडून तशी त्यांना हमी दिली गेली; परंतू काही चुकीच्या पध्दतीने पसरविल्या जाणा-या बातम्यांच्या स्वरूपातील अफवांवर मुस्लीम समाजाने लक्ष देऊ नये.
मतदान हा प्रत्येकाचा अधिकार असून त्याची गोपनियता बाळगणे हे कर्तव्य आहे. आपल्या बुध्दीने व खुल्या मनाने विचार करून प्रत्येक मुस्लीम प्रौढ मतदाराने मतदानाचा निर्णय घ्यावा व येत्या सोमवारी (दि.२९) मतदान केंद्रांवर अवश्य हजेरी लावून स्वयंस्फूर्तीने मतदानाचा हक्क बजवावा. जेणेकरून आपला भारत व देशाची लोकशाही अधिक बळकट होण्यास मदत होईल, असे खतीब यांनी जाहीर केलेल्या प्रसिध्दी पत्रकात स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे. त्यांनी मुस्लीम समाजाला मतदानासोबत कुठल्याहीप्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नका असेही आवाहन केले आहे. प्रसिध्दीपत्रकावर मुस्लीम समाजाचे ज्येष्ठ नेते सय्यद मीर मुख्तार अशरफी, हाजी वसीम पिरजादा यांच्याही स्वाक्षºया आहेत.
--
आयुष्यभर समाजाचे सेवक म्हणून मी कार्य करत आलो. समाजाने कुठल्याहीप्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नये, मतदान करणे हा आपल्या वैयक्तिक अधिकार आहे. तो आवर्जून बजवावा. खुल्या मनाने स्वयंस्फूर्तीने निर्णय घेत कुठल्याही आमीषाला बळी न पडता निर्धास्तपणे मतदानासाठी येत्या सोमवारी सकाळी बाहेर पडावे.
- मीर मुख्तार अशरफी, पदाधिकारी ईदगाह समिती