मृगाच्या अखेर पावसाची ‘हजेरी’
By admin | Published: June 20, 2016 10:42 PM2016-06-20T22:42:13+5:302016-06-21T00:27:43+5:30
मृगाच्या अखेर पावसाची ‘हजेरी’
नाशिक : संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर अगदी अखेरच्या चरणाच्या शेवटच्या दिवशी यंदाच्या मोसमातील मान्सूनने पहिलीच हजेरी सोमवारी (दि.२०) अर्ध्या जिल्ह्यात लावली. त्याआधी तुरळक स्वरूपात जिल्ह्यात काही ठिकाणी रविवारी रात्री पावसाने हजेरी लावली.
येणार येणार म्हणून बहुचर्चित मान्सून संपूर्ण मृग नक्षत्रात बरसलाच नाही. मागील वर्षाप्रमाणेच यंदाचा जून कोरडा जातो की काय? अशी भीती बळीराजाला लागलेली असतानाच मागील आठवड्यात ढगांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. मात्र यंदाच्या मोसमातील मान्सूनने प्रत्येक वेळी बळीराजाला हुलकावणीच दिली होती. रविवारी मात्र दिवसभर पावसाचे वातावरण होते. दुपारनंतर जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी भागांतील काही परिसरात पावसाने तुरळक हजेरी लावली. (पान ७ वर)
सायंकाळी निफाड तालुक्यातील पिंपळगावसह अन्य भागांत रस्ते भिजण्यापुरतीच पावसाची हजेरी होती. सोमवारी (दि.२०) सकाळी आठ वाजेपर्यंत ०.८ मिलीमीटर अत्यल्प पावसाची नोेंद करण्यात आली. सोमवारी दिवसरभही नाशिक शहरासह अन्य परिसरात पावसाचे वातावरण होते. दुपारनंतर शहरातील मध्य नाशिकसह पंचवटी परिसरात पावसाने तुरळक स्वरूपात हजेरी लावली. नाशिकसह, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, भागातील काही भागांत पावसाने हजेरी लावल्याचे चित्र होते. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत हवामान खात्याकडे दिवसभरात संपूर्ण जिल्ह्यात अवघ्या ८ मिलीमीटर पावसाची नोेंद करण्यात आली आहे. मृग नक्षत्राच्या अखेरच्या चरणात हजेरी लावणारा मान्सून मंगळवार (दि.२१) दुपारनंतर सुरू होणाऱ्या आद्रा नक्षत्रात किती बरसतो, याकडे जिल्ह्यातील बळीराजाचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)