‘मुथूट’ दरोड्यातील म्होरक्याला ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 01:37 AM2019-06-25T01:37:46+5:302019-06-25T01:39:20+5:30
उंटवाडी येथील मुथूट फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर दहा दिवसांपूर्वी भरदिवसा दरोड्याचा प्रयत्न परराज्यांमधील सराईत गुंडांच्या टोळीने केला. यावेळी गोळीबार करत संशयितांनी प्रतिकार करणाऱ्या धाडसी कर्मचाºयाला ठार मारले.
नाशिक : उंटवाडी येथील मुथूट फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर दहा दिवसांपूर्वी भरदिवसा दरोड्याचा प्रयत्न परराज्यांमधील सराईत गुंडांच्या टोळीने केला. यावेळी गोळीबार करत संशयितांनी प्रतिकार करणाऱ्या धाडसी कर्मचाºयाला ठार मारले. या गंभीर घटनेने अवघे शहर हादरले तसेच पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले होते. शहर पोलिसांचे विविध पथके या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करत असताना एका पथकाला टोळीच्या म्होरक्याच्या मुसक्या सुरतमध्ये आवळण्यास यश आल्याची माहिती आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या गुन्ह्यात सूत्रधार हाती लागला असला तरी त्याचे अन्य पाच साथीदार अद्यापही फरार आहेत.
अंबड पोलीस ठाणे हद्दीत उंटवाडी येथील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात शुक्रवारी (दि.१४) सहा संशयित दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला चढविला होता.
या हल्ल्याप्रसंगी दरोडेखोरांना विरोध करणारा धाडसी कर्मचारी साजू सॅम्युअलचा बळी गेला. हल्लेखोरांनी पाच गोळ्या त्याच्या शरीरावर झाडल्या; मात्र त्याने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे कोट्यवधींचे सोने सुरक्षित राहिले आणि हल्लेखोरांना कार्यालयातून रिकाम्या हाती परतावे लागल्याचेही नांगरे-पाटील म्हणाले.
दरम्यान, हल्लेखोरांचे उशिरा हाती लागलेले वर्णन, सूक्ष्म पद्धतीने त्यांनी रचलेला कट, बनावट नोंदणी क्रमांकाच्या गुन्ह्यात वापरलेल्या पल्सर, गुन्हा करून अवघ्या १७ मिनिटांत शहराबाहेर पसार होण्यास यशस्वी ठरलेले गुन्हेगार या बाबींमुळे पोलिसांपुढे त्यांचा माग काढण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते. संशयित आरोपींना गजाआड करण्यासाठी नांगरे-पाटील यांनी तत्काळ उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली दहा स्वतंत्र पथके राज्यात व परराज्यांमध्येही रवाना केले. गुन्ह्याचा तपास सुरू असताना रामशेज किल्ल्याजवळ गुन्ह्यात वापरलेल्या तीन पल्सर-२२० दुचाकी पोलिसांना दुसºया दिवशी आढळून आल्या.
या दुचाकींचे नोंदणी क्रमांक बनावट असल्याचे निष्पन्न झाले तसेच चेसीज, इंजिन क्रमांकाशी गुन्हेगारांनी छेडछाड केल्याने तपासाचा पुढील मार्ग बंद झाला. पोलिसांनी थेट पुण्याच्या चाकणमधील बजाज कंपनीकडून पल्सर-२२० दुचाकींची माहिती मागविली. तसेत फायनान्स कंपन्यांकडूनही या प्रकारच्या दुचाकींची माहिती घेत एका दुचाकीच्या गुजरातमधील जनार्दन गुप्ता नावाच्या मालकापर्यंत पोलिस पोहचले़ त्यावरून पोलिसांनी माग काढत सुरतमधून मूळ उत्तर प्रदेशच्या बैसान गावाचा रहिवासी टोळीचा म्होरक्या जितेंद्र विजयबहाद्दूर सिंग राजपुत याच्या मुसक्या आवळल्या.
मुझफ्फरपूरच्या तुरुंगात झाली भेट
४मनीष राय या कुख्यात गुंडासोबत जितेंद्रची भेट २०१२ साली मुझफ्फरपूरच्या एका तुरुंगात झाली. जितेंद्र खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगण्यासाठी तुरुगात गेला होता. जितेंद्र याने जौनपूर जिल्ह्याच्या पोलीस ठाणे हद्दीत त्याने खून केला होता. त्यानंतर मनीषसोबत पुन्हा एका लग्नात हे भेटले. मनीषने जितेंद्र यास कुख्यात गुंडांची माहिती देत त्यांच्या मदतीने दरोडा टाकण्याचा कट महाराष्टÑात रचण्यास सांगितल्याचे तपासात पुढे आले.
श्रमिकनगरमध्ये चार दिवस मुक्काम
४कट रचल्यानंतर पप्पू ऊर्फ अनुज साहूसह अन्य आरोपी सहा ते सात वेळा नाशिकमध्ये सुभाष गौडकडे आले होते. गौड हा २०१६पासून श्रमिकनगर सातपूरमध्ये वास्तव्यास आहे. त्याने गुन्हेगारांची श्रमिकनगरमध्ये भाडेतत्त्वावर राहण्याची व्यवस्था केली होती. चौघे अमृतलाल नावाच्या व्यक्तीच्या चाळीमधील खोलीत राहिले; मात्र तेथे त्याच्या पत्नीने या चौघांवर संशय घेत ‘या मुलांना हूसकून द्या’ म्हणून ओरड केली. त्यानंतर गौडने या चौघांना जवळील पांडे नावाच्या व्यक्तीच्या खोलीत स्थलांतरीत केल्याचे पोलिसांनी सांगितले.
असे निसटले नाकाबंदीतून...
दरोड्याची पूर्वतयारी करताना या सराईत गुंडांच्या टोळीने नाशिकमध्ये मुक्काम ठोकून पोलिसांच्या नाकाबंदी कारवाईचाही सूक्ष्मपणे अभ्यास केला. नाकाबंदीतून निसटण्याची त्यांनी नियोजनबद्धरीत्या आखणी केली. तीन पल्सरवरून प्रत्येकी दोन, तर कधी एक असे करून हे पाच गुन्हेगार शहराबाहेर अवघ्या १७ मिनिटांत निघून गेले. दरम्यान, त्यांनी पल्सर दुचाकींची अदलाबदल करण्यापासून स्वत:चे शर्ट बदलण्यापर्यंत सर्व ती खबरदारी घेतली. अत्यंत ‘स्मार्ट’ पद्धतीने ‘मायक्रो प्लॅनिंग’ करून या सराईत गुन्हेगारांनी दरोड्याचा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरोड्यात यांचा सहभाग निष्पन्न
मुथूट फायनान्स कार्यालयावर दरोड्याच्या हेतूने सशस्त्र हल्ला चढवून एकास ठार मारणाºया टोळीमध्ये संशयित जितेंद्रसिंग राजपुतसोबत त्याचा सख्खा भाऊ कुख्यात गुंड आकाशसिंग र
ाजपुत, उत्तर प्रदेशमधील सराईत परमेंदर सिंग, पश्चिम बंगालमधील दरोडेखोर पप्पू ऊर्फ अनुज साहू, सुभाष गौड व गुरू नावाच्या एका संशयिताचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आईचा वर्तमानपत्रातून जाहीरनामा
आकाशसिंग राजपूत हा कुख्यात गुन्हेगार असून त्याने दरोडे, खुनासारखे गुन्हे केले आहेत. त्याचा माझ्याशी काहीही एक संबंध नसल्याचा जाहीरनामा त्याच्या आईने उत्तर प्रदेशमधील स्थानिक वर्तमानपत्रातून प्रसिद्ध केल्याचेही पोलिसांना आढळून आले. त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता जाहिरात प्रसिद्ध झालेले वर्तमानपत्र पोलिसांच्या हाती लागले.
अनूज राजकीय पक्षाशी संबंधित
अनूज साहू ऊर्फ पप्पू हा पश्चिम बंगालमधील सत्ताधारी राजकीय पक्षाशी संबंधित असल्यामुळे त्याला ताब्यात घेताना पोलिसांना मोठा त्रास सहन करावा लागला. स्थानिक पोलिसांचे सहकार्य जरी मिळाले तरीदेखील अनूजला ताब्यात घेताना राजकीय दबावाचाही सामना पथकाला करावा लागला परिणामी तो निसटला.
चुलत बहीण रडारवर
पप्पु उर्फ अनुज साहूच्या मुसक्या आवळण्यासाठी पथकाने सापळा रचला. पथक पश्चिम बंगालमध्ये त्याच्या राहत्या घरी पोहचले त्यावेळी तो तेथून फरार झालेला होता. त्याची नाशिकमध्ये राहणारी चुलत बहीण संशयित रिंकू गुप्ता हिने त्याला फोनवरून बंगाली भाषेत संवाद साधून सावध केल्याचे तपासात पुढे आले. लवकरच अनुजसह अन्य फरार संशयित गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यास यश येईल, असा आशावाद नांगरे-पाटील यांनी व्यक्त केला. रिंकूदेखील पोलिसांच्या रडारवर आहेत़
नऊ दिवसांची कोठडी
दरोड्यातील मुख्य सुत्रधार जितेंद्रसिंग याला पोलिसांनी अटक करून सोमवारी (दि. २४) न्यायालयात हजर केले. अतिरिक्त मुख्य न्यायालयात बी. के. गावंडे यांच्या न्यायालयाने त्यास नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकारी वकील विद्या देवरे-निकम यांनी बाजू मांडली.