‘मुथूट’ दरोडा : टोळीतील चौथ्या दरोडेखोराला ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 08:50 PM2019-10-01T20:50:53+5:302019-10-01T20:54:13+5:30
सुभाष याने दरोडा टाकण्यापुर्वीच आपल्या कुटुंबाला शहरातून मुळ उत्तरप्रदेश राज्यातील गावी स्थलांतरीत केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
नाशिक : मुथूट फायनान्स कार्यालयात सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या मुख्य सुत्रधाराधारासह त्याच्या तीघा साथीदारांना पोलिसांनी यापुर्वीच अटक केली. या टोळीला स्थानिक म्हणून सर्वोतोपरी मदत पुरविणारा सातपूरचा रहिवासी सुभाष गौड हा घटनेपासून फरार झाला होता. पोलीस त्याच्या मागावर होते; मात्र तो सातत्याने पोलिसांना गुंगार देण्यास यशस्वी होत होता. अखेर तपासी पथकाने त्यास बेड्या ठोकल्या.
सुभाष हा एजंट म्हणून सातपूर भागात वावरत होता. याने दरोडेखोरांच्या टोळीची राहण्यापासून सर्व व्यवस्था सातपूरमध्ये केल्याचे तपासात पुढे आले आहे. दरोडेखोरांना शहराच्या विविध रस्ते, परिसर, पोलिसांचे नाकाबंदी पॉइंट आदिंविषयीची सर्व माहिती पुरविण्यापासून तर त्यांच्यासोबत उंटवाडीसह विविध रस्त्यांची रेकी करण्यामध्येही त्याचा सक्रीय सहभाग असल्याचे पोलिसांनी यापुर्वीच सांगितले आहे. पोलीस जून महिन्यापासून त्याच्या मागावर होते. त्याच्या अटकेनंतर दरोड्याचा कट रचण्यापासूनची सर्व प्रकारची माहिती पोलिसांच्या हाती लागणार आहे. त्यामुळे त्याला अटक करणे गरजेचे होते. दरोडेखोरांनी दरोड्यात पल्सर दुचाकींचा वापर करत शहरातून बाहेर पलायन करून ट्रकमधून थेट सुरत गाठले होते. सुभाष याने दरोडा टाकण्यापुर्वीच आपल्या कुटुंबाला शहरातून मुळ उत्तरप्रदेश राज्यातील गावी स्थलांतरीत केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. सशस्त्र दरोडा टाकत एका तरूणाला गोळ्या घालून ठार मारणा-या १२ दरोडेखोरांच्या टोळीतील चौथा दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागला आहे. संशयित आकाशिसंग राजपूत त्याचा भाऊ जितेंद्रसिंग राजपूत आणि परमेंदरिसंग या तीघांना यापुर्वीच पोलिसांनी अटक केली आहे. सध्या हे तीघे नाशिक मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत.